प्रतिनिधी
Monsoon Session मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) सर्वांगीण विकासाचा एक भव्य आणि महत्त्वाकांक्षी आराखडा राज्य शासनाने तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील मुंबई केवळ एक महानगर न राहता जागतिक दर्जाचे सुरक्षित, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
२०४७ पर्यंत या प्रदेशाचा जीडीपी ८२५ अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. (Monsoon Session)
मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १३ हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. शहरातील ३७० पूरप्रवण ठिकाणांवरून अवघ्या ३० मिनिटांत पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नालेसफाईतील पारदर्शकता राखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित फसवणूक शोध प्रणालीचा वापर केला जात असून, त्याद्वारे कंत्राटदारांवर कोट्यवधी रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. (Monsoon Session)
मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवणारे अनेक प्रकल्प सध्या वेगाने पूर्ण होत आहेत. ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदा आणि भारतातील सर्वाधिक उंच केबल-स्टेड पुलाचा समावेश आहे. शहराचे ९५ टक्के रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे उद्दिष्ट असून मे २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो जाळ्याचा विस्तार, गोरेगाव-मुलुंड बोगदा, किनारी रस्ते आणि विविध उड्डाणपुलांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. (Monsoon Session)
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गारगाई प्रकल्पापासून ते मनोरी आणि वर्सोवा येथील डिसॅलिनेशन प्रकल्पांपर्यंत मोठी गुंतवणूक केली जात आहे. यामुळे २०२९-२०३० पर्यंत शहराला मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच, मुंबईच्या पुनर्विकासासाठी स्वयं पुनर्विकास, क्लस्टर आणि धारावी पुनर्विकास यांसारख्या प्रकल्पांतून नागरिकांना हक्काची आणि मोठी घरे देण्याचे शासनाचे धोरण आहे. (Monsoon Session)
केवळ भौतिक विकासच नव्हे, तर सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्यासाठी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्याधुनिक स्मारक निश्चित कालावधीत पूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात सध्या १२ लाख २६ हजार ७०७ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांवर काम सुरू असून, ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची देणारी ठरेल. मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाची फिनटेक राजधानी आणि स्टार्टअप हब म्हणून भविष्यात अधिक वेगाने विकसित होत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. (Monsoon Session)
