Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Monsoon Session : केवळ प्रमाणपत्राने महिलांचे नशीब बदलणार का? 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयका'वरून विधानसभेत जोरदार खडाजंगी

  • प्रतिनिधी

​Monsoon Session महाराष्ट्र विधानसभेत गुरुवारी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ वर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर ते एकमताने संमत करण्यात आले. मात्र, हे विधेयक मंजूर होताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी सरकारची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून आले.

“फक्त प्रमाणपत्र देऊन महिलांच्या आयुष्यात काय बदलणार?” असा सवाल करत सदस्यांनी या विधेयकातील तरतुदींच्या व्यावहारिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Monsoon Session)

​कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडताना, महिलांना ‘शेतकरी’ ही अधिकृत ओळख मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधेयकाची चिरफाड करत, जोवर महिलांच्या नावावर जमीन नाही, तोवर त्यांना शेतकरी कसे मानणार, असा प्रश्न केला. “बँका या प्रमाणपत्राच्या आधारे कर्ज देणार का? कर्ज देताना तारण काय घेणार? आणि केवळ समित्या स्थापन करून महिलांची फसवणूक करू नका,” असा इशारा त्यांनी दिला. (Monsoon Session)

​शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी अर्धा एकर जमिनीच्या अटीवरून सरकारला धारेवर धरले. “राज्यात शेतकरी दर्जा मिळण्यासाठी अर्धा एकर जमीन लागते, मग ज्या महिलांकडे जमीन नाही, त्यांना तुम्ही ही जमीन कशी देणार?” असे आव्हान त्यांनी दिले. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांनीही नगरपरिषदेतील महिलांच्या प्रमाणपत्राच्या प्रक्रियेवर आणि कर्जपुरवठ्याबाबतच्या स्पष्टतेवर प्रश्न उपस्थित केले. तर कैलास पाटील यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत, यातही गैरप्रकार होण्याची भीती व्यक्त केली. (Monsoon Session)

​या सर्व आक्षेपांना उत्तर देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “जमीन नावावर करणे हा या कायद्याचा उद्देश नसून, महिलांना एक स्वतंत्र ओळख आणि समानतेचा दर्जा देणे हा आमचा हेतू आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.” (Monsoon Session)

​विधेयक एकमताने मंजूर झाले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर बँकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि जमीनहीन महिलांना या योजनेचा होणारा फायदा, यावर या कायद्याचे यश अवलंबून असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले. आता सरकारच्या आश्वासनानंतर ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना खरोखरच या विधेयकाचा लाभ मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Monsoon Session)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post