Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Crime : घाटकोपर स्थानकावरील शौचालयात वृद्धेवर अत्याचार; नराधम गजाआड

Mumbai Crime : घाटकोपर स्थानकावरील शौचालयात वृद्धेवर अत्याचार; नराधम गजाआड

Mumbai Crime : घाटकोपर रेल्वे स्थानकावरील (Ghatkopar railway station) सार्वजनिक शौचालयात ६० वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय नराधमाला कुर्ला रेल्वे पोलिसांनी (kurla railway police) अटक केली आहे.

तस्लिम नूर मोहम्मद शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला असल्फा व्हिलेज येथून ताब्यात घेतले. मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली असून, या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

खडवली येथे राहणाऱ्या पीडित वृद्धा आणि त्यांची १८ वर्षीय मुलगी कामानिमित्त दररोज मुंबईत येतात. मुलगी अंधेरी येथे कामाला जाते, तर वृद्धा घाटकोपर येथील एका मंदिराबाहेर गायी सांभाळण्याचे काम करतात. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मायलेकी घरी जाण्यासाठी घाटकोपर स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर कसारा लोकलची वाट पाहत होत्या. लोकलला उशीर असल्याने वृद्धा फलाट क्रमांक २/३ च्या सीएसएमटी दिशेकडील सार्वजनिक शौचालयात गेल्या.

त्याच वेळी मद्याच्या नशेत असलेल्या तस्लिमने त्यांचा पाठलाग करत शौचालयात प्रवेश केला. वृद्धेने प्रतिकार केला असता आरोपीने त्यांना मारहाण करत बळजबरीने अत्याचार केला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने माग काढत शुक्रवारी आरोपीला असल्फा व्हिलेजमधून अटक केली.

मूळचा उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) असलेला तस्लिम तीन वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. तो असल्फा व्हिलेज येथील एका गारमेंट कारखान्यात टेलरिंगचे काम करत असून तेथेच वास्तव्यास होता. त्याचे लग्न झाले असून पत्नीने त्याला सोडून दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

फलाटावरील शौचालयांना केअरटेकरची गरज

मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर शौचालये फलाटाच्या अगदी शेवटच्या टोकाला बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी कोणताही ‘केअरटेकर’ किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानकांवरील शौचालयांत तातडीने केअरटेकर नेमण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे पोलिसांनीही या संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post