Mumbai Crime : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका ऑनलाईन टेंडरवरून दोन गटांमधील वाद विकोपाला गेला असून, माटुंगा (Matunga) येथील एफ-उत्तर (F/North) विभागाच्या कार्यालयाबाहेर कंत्राटदारांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
या वादानदरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात दोन्ही बाजूंचे कंत्राटदार जखमी झाले असून, त्यांना तातडीने सायन रुग्णालयात (Sion Hospital) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार भैरू पदम सिंग हे एक खाजगी सिव्हिल कॉन्ट्रक्टर असून, त्यांनी माटुंगा येथील महानगरपालिकेच्या एफ-उत्तर वॉर्डातील झोपडपट्टी परिसरातील लादी व कोबा कामाच्या ऑनलाईन टेंडरसाठी अर्ज केला होता.
टेंडर भरल्या नंतर त्यांना अज्ञात व्यक्तींकडून “मुंबई महानगरपालिकेचे टेंडर घेऊ नकोस” अशी धमकी दिली जात होती. याच कारणावरून ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते मनपा कार्यालयात चौकशीसाठी आले होते. (Mumbai Crime)
कार्यालया बाहेर पडत असताना तेलंग रोडवरील पायोनियर हॉल जवळ चार अज्ञात इसमांनी त्यांना अडवून धक्काबुक्की व मारहाण केली. आधीच जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे तक्रारदाराने सुरक्षेसाठी स्वतःजवळ चाकू बाळगला होता. हल्लेखोरांपैकी एकाने पोटावर चाकूने वार केला, तर दुसऱ्याने बियरची बाटली हातावर फोडली. आत्मरक्षणासाठी आणि हल्लेखोरांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूंना दुखापती झाल्या. घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिेतेच्या संबंधित कलमांखाली गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. (Mumbai Crime)

