Mumbai Disease: पावसाळा सुरू होताच मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. विशेषतः जुलै महिन्यात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
जुलै महिन्यात मलेरियाचे १,३८०, डेंग्यूचे ४६६ आणि लेप्टोस्पायरोसिसचे ७८ रुग्णांची नोंद झाली आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील २३ लाख १ हजार १४२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच ७५ हजार ६१० नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. (Mumbai Disease)
जूनच्या तुलनेत जुलैमध्ये रुग्णांची वाढ
यंदा जून महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिली होती. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध भागांत पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आणि त्याचबरोबर डासांमुळे पसरणाऱ्या तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यातील रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे :
- मलेरिया - १,३८०
- डेंग्यू - ४६६
- लेप्टोस्पायरोसिस - ७८
- गॅस्ट्रो - ५५७
- एच१एन१ (स्वाइन फ्लू) - १७५
- चिकुनगुनिया - ७ (Mumbai Disease)
मलेरिया आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने २७ हजार ८१३ ठिकाणी ॲनोफिलीस डासांच्या उत्पत्तीस्थाने शोधून काढल्याची माहिती दिली आहे. तसेच डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस डासांच्या २१ हजार २१४ उत्पत्तीस्थाने आढळून आली असून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Disease)
पालिकेची ‘झिरो डास प्रजनन’ मोहीम
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी, पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तपासणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी ‘झिरो डास प्रजनन’ मोहीम प्रभावीपणे सुरू असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोनाचा संसर्गही पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर शेकडो मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. यंदा जून महिन्यात २७ कोरोना रुग्ण आढळले होते, तर जुलै महिन्यात हा आकडा ५८ वर पोहोचला आहे. मात्र, मुंबई आजही कोरोनावर दृढपणे नियंत्रण ठेवून असल्याचे पालिकेने नमूद केले आहे. (Mumbai Disease)
नागरिकांसाठी आरोग्य विभागाचा सल्ला
साथीच्या आजारांपासून बचावासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
- साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
- योग्य आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या.
- आजारी व्यक्तींपासून आवश्यक अंतर ठेवा.
- कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
- घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका आणि डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घ्या.
मुंबईत पावसाचा जोर कायम असल्याने येत्या काही दिवसांत साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Mumbai Disease)

