Mumbai Local Mega Block Today : रविवार (5 जुलै 2026) रोजी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Harbour Line mega block) जाहीर केला आहे.
मात्र, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (Main Line) कोणताही मेगाब्लॉक नाही, तसेच पश्चिम रेल्वेवर दिवसा जम्बो ब्लॉक नसल्याने त्या मार्गावरील लोकल सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकची स्थिती
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला ते वाशी या दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा आणि इतर तांत्रिक कामे केली जाणार आहेत.
मेगाब्लॉकदरम्यान खालील हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील.
- सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यानच्या काही लोकल सेवा रद्द राहतील.
- पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यानच्या काही लोकलही धावणार नाहीत.
प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष लोकल सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
- सीएसएमटी - कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील.
- वाशी - पनवेल दरम्यानही विशेष सेवा उपलब्ध असतील.
- तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरूळ मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारी सीएसएमटी-ठाणे-कल्याण मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसल्याने या मार्गावरील लोकल सेवा नियमित वेळापत्रकानुसार धावतील. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नाही
पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे की 5 जुलै रोजी दिवसा कोणताही जम्बो ब्लॉक ठेवण्यात आलेला नाही. मात्र, 4 जुलैच्या मध्यरात्री ते 5 जुलैच्या पहाटे वसई रोड-वैतरणा स्थानकांदरम्यान फास्ट मार्गावर देखभाल कामासाठी रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे दिवसा चर्चगेट ते विरार मार्गावरील लोकल सेवा नियमित सुरू आहेत.
मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. काही भागांत पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
