Mumbai Local update : मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, (Mumbai monsoon) शुक्रवारी (3 जुलै) देखील, सकाळी मुंबई लोकल सेवा काहीशी विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील उपनगरी रेल्वे सेवा सुरू असली, तरी अनेक गाड्या उशीराने धावत असल्याने कार्यालयीन वेळ गाठणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा आणि विलंबाचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम कल्याण-सीएसएमटी आणि चर्चगेट-विरार या दोन्ही उपनगरी मार्गांवर दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवरील अप आणि डाउन दिशेतील लोकल गाड्या सुमारे १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
तर दुसरीकडे, सीएसएमटी-पनवेल मार्गावरील अप आणि डाउन दोन्ही दिशेतील लोकल गाड्या सुमारे ५ ते १० मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते वाहतुकीचाही वेग मंदावला असून वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना अतिरिक्त वेळ राखून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
सध्या रेल्वेची स्थिती
- पश्चिम रेल्वे: सुमारे १० ते १५ मिनिटांचा विलंब
- मध्य रेल्वे (Main Line): सुमारे ५ ते १० मिनिटांचा विलंब
- हार्बर लाईन: सुमारे ५ ते १० मिनिटांचा विलंब
- सेवा: तिन्ही मार्गांवर लोकल सेवा सुरू, मात्र सावधगिरीने संचालन सुरू
दरम्यान, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकालाही मुसळधार पावसाचा फटका बसला असून, काही गाड्या त्यांच्या सुनिश्चीत वेळेपेक्षा उशारीने धावत आहेत. ज्याचा परिणाम मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवरही होत आहे.
दादरसह काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी
दादरसह काही स्थानकांजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र रेल्वे प्रशासनाने सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाणी उपसण्याचे काम सुरू असल्याने सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. सर्व मार्गांवर गाड्या सुरू असून त्या सावधगिरीने चालविल्या जात आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी अधिकृत रेल्वे सोशल मीडिया हँडल्स आणि स्थानकांवरील घोषणांची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.
: वाहनधारकांनो सावधान! 'HSRP' नंबरप्लेटसाठी मुदतवाढ?; परिवहन मंत्री Pratap Sarnaik म्हणाले…
