Mumbai Local Western Railway : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर २०२६पासून बदल करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने सुधारित उपनगरी वेळापत्रक लागू केले असून प्रवाशांच्या गरजेनुसार काही लोकलच्या फेऱ्या, मार्ग, थांबे आणि वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, लोकल फेऱ्यांची एकूण संख्या वाढलेली नसून १,४१४ फेऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.
६ नव्या लोकल, ६ फेऱ्या रद्द
नव्या वेळापत्रकानुसार अप दिशेला २ आणि डाउन दिशेला ४, अशा एकूण ६ नव्या धीम्या लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी जुन्या ६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नव्या लोकलच्या महत्त्वाच्या वेळा
- सकाळी ७.४६ - भाईंदर ते विरार
- सकाळी ११.५८ - वांद्रे ते चर्चगेट
- रात्री १०.१४ - बोरिवली ते भाईंदर
- रात्री १०.५१ - बोरिवली ते विरार
- रात्री ११.५१ - विरार ते बोरिवली
- मध्यरात्री १२.२८ - बोरिवली ते भाईंदर (Mumbai Local Western Railway
यामुळे विशेषतः रात्री उशिरा विरार, नालासोपारा आणि भाईंदरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होण्याची शक्यता आहे.
या ६ लोकल फेऱ्या रद्द
नव्या वेळापत्रकात खालील सहा सेवा मागे घेण्यात आल्या आहेत :
- सकाळी ९.५६ - चर्चगेट-बोरिवली
- सकाळी १०.५० - बोरिवली-चर्चगेट
- सकाळी ११.०० - चर्चगेट-मुंबई सेंट्रल
- दुपारी १.१६ - चर्चगेट-बोरिवली
- दुपारी २.३० - बोरिवली-चर्चगेट
- रात्री ९.०१ - चर्चगेट-मुंबई सेंट्रल (Mumbai Local Western Railway)
याशिवाय दोन एसी सेवांचाही नव्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ
पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता दोन नियमित लोकल एसी सेवांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत.
- सायंकाळी ५.२८ - चर्चगेट-बोरिवली लोकल आता एसी म्हणून धावणार
- सायंकाळी ६.२४ - बोरिवली-चर्चगेट लोकल आता एसी म्हणून धावणार
या बदलानंतर सोमवार ते शुक्रवार एसी लोकलची संख्या १४५ वरून १४७ होणार आहे. शनिवार आणि रविवारी ११६ एसी लोकल फेऱ्या उपलब्ध राहतील. (Mumbai Local Western Railway)
डहाणूकरांना मोठा दिलासा
डहाणू रोडच्या प्रवाशांसाठी नव्या वेळापत्रकातील महत्त्वाचा बदल म्हणजे, दादर ते डहाणू रोड थेट लोकल सेवा आजपासून सुरू होणार आहे. यापूर्वी दादर-विरार आणि विरार-डहाणू रोड अशा स्वतंत्र लोकलमुळे डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना विरार येथे लोकल बदलावी लागत होती. आता या दोन सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
नवीन सेवा दादरहून सायंकाळी ५.२२ वाजता सुटेल आणि डहाणू रोडला सायंकाळी ७.३० वाजता पोहोचेल. (Mumbai Local Western Railway)
: Today Horoscope 1 September 2026 : सप्टेंबरची सुरुवातच धमाकेदार! 'या' 4 राशींचं आज नशीब चमकणार
विरार-दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत
सकाळच्या गर्दीच्या वेळेत विरारच्या प्रवाशांना आणखी एक दिलासा मिळणार आहे. विरारहून सकाळी ८.२३ वाजता सुटणारी दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत धावणार आहे.
ही लोकल चर्चगेटला सकाळी ९.४८ वाजता पोहोचेल. त्यानंतर चर्चगेटहून सकाळी ९.५२ वाजता सुटणारी लोकल नालासोपारापर्यंत धावणार आहे. (Mumbai Local Western Railway)
दोन जलद विरार लोकलचा बोरिवली थांबा रद्द
गर्दीच्या वेळेत चर्चगेट-विरार जलद लोकलमध्ये बोरिवली येथे मोठी गर्दी आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रकार होत असल्याने दोन सेवांचा बोरिवली थांबा रद्द करण्यात आला आहे. चर्चगेटहून सायंकाळी ६.२२ आणि ७.०५ वाजता सुटणाऱ्या दोन जलद विरार लोकलना आता बोरिवली येथे थांबा नसेल.
त्यामुळे, नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, १ सप्टेंबरपासून प्रवास करण्यापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Local Western Railway)
हेही पाहा:

