Nagpur Crime : नागपूरमधून नुकताच चोरीचा एक अजब-गजब प्रकार समोर आला आहे. मोबाईल, पर्स, दागिने किंवा मोटरसायकल, कार चोरीला गेल्याच्या घटना आपल्या कानावर येत असतात, मात्र नागपूरात एका पठ्ठ्याने चक्क इलेक्ट्रिक बस चोरी केल्याचा धक्कादायक प्रकर समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) इलेक्ट्रिक बस चोरीचे हे प्रकरण सध्या सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.
चार्जिंग स्टेशनवरून थेट बस घेऊन पोबारा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलैच्या मध्यरात्री सुमारे 3.30 वाजता इमामवाडा डेपोतील चार्जिंग स्टेशनवर उभी असलेली MH-49 BZ-8258 क्रमांकाची ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस आरोपीने पळवून नेली. बस सकाळपर्यंत डेपोत परत न आल्याने कर्मचाऱ्यांच्या लक्षात प्रकार आला आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी बसची शोधमोहीम सुरु केली. दरम्यान, पळवून नेलेल्या बसची बॅटरी चार्ज संपल्याने ती एकाच जागी बराच वेळ थांबून होती, त्यावेळी वाहनातील ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करुन पोलिसांनी बसचे लोकेशन शोधून काढले आणि काही तासांतच अमरावती पोलिसांनी आरोपीला बससह ताब्यात घेतले.
ट्रॅकिंग सिस्टीम ठरली पोलिसांसाठी महत्त्वाची
एमएसआरटीसीच्या ई-बसमध्ये बसविण्यात आलेल्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) मुळे अधिकाऱ्यांनी बसचे लोकेशन शोधले. इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंगद्वारे बस अमरावतीच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी अमरावती पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी नंदा मार्केट परिसरात बस शोधून काढली आणि संशयिताला ताब्यात घेतले.
चार्जिंग संपल्याने चोर अडकला
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी बस घेऊन अमरावतीपर्यंत पोहोचला. मात्र, ई-बसची चार्जिंग संपल्यामुळे पुढे प्रवास शक्य झाला नाही. याचदरम्यान पोलिसांनी बसचा माग काढत आरोपीला अटक केली.
आरोपीवर 20 बस चोरीचे गुन्हे
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विष्णू गणपती निलावर (रा. रंगारेड्डी, तेलंगणा) असे असून तो सराईत आंतरराज्यीय वाहनचोर असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस चौकशीत त्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून एकूण 20 बसेस चोरी केल्याची कबुली दिली आहे. नांदेडमधील बस चोरीच्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
बॅटरी आणि सुटे भाग विकण्याचा होता उद्देश
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी चोरी केलेल्या वाहनांमधील महागडे सुटे भाग, विशेषतः ई-बसची बॅटरी, टायर आणि इतर उपकरणे वेगळी करून विकत असे. इलेक्ट्रिक बसमधील बॅटरीची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याने त्याने विशेषतः ई-बसच लक्ष्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
