Dailyhunt

नक्षल्यांची साथ अन् काँग्रेसचा हात, Amit Shah यांचा घणाघात

  • नित्यानंद भिसे

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नियम १९३ अंतर्गत नक्षलवादावर झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक ऐतिहासिक आणि आक्रमक भाषण केले. या भाषणात त्यांनी केवळ नक्षलवादाविरुद्धच्या लढाईची आकडेवारीच सादर केली नाही, तर काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर आणि राहुल गांधींच्या राजकीय भूमिकेवर तीव्र प्रहार केले.

'नक्षलवाद्यांसोबत राहून काँग्रेस नेते स्वतःच नक्षलवादी बनले आहेत,' अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

राहुल गांधी आणि 'नक्षल' संबंधांचा पर्दाफाश

अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणात राहुल गांधींच्या कारकिर्दीतील अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख केला, जेथे ते नक्षलवादी समर्थकांसोबत दिसले होते. २०१८ मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) हैदराबादमध्ये गुम्मंडी विठ्ठल राव उर्फ गद्दार यांना भेटले होते, जे वैचारिकदृष्ट्या जवळचे आहेत. मे महिन्यात २०२५ मध्ये राहुल गांधी यांनी शांतता समन्वय समितीचीही भेट घेतली. ते म्हणाले की, १७२ सैनिकांना ठार मारणाऱ्या हिडमाला जेव्हा मारण्यात आले, तेव्हा इंडिया गेटवर 'तुम्ही हिडमाला मारल्यास, हिडमा प्रत्येक घरातून बाहेर येईल', अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. राहुल गांधींनी हा व्हिडिओ ट्विट केला. त्यांनी १९७० पासून मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाला पाठिंबा दिला. त्यांनी नरसंहाराला पाठिंबा दिला. २०,००० लोक मारले गेले. यात जर कोणी सर्वात मोठा गुन्हेगार असेल, तर तो डाव्या विचारसरणीचा काँग्रेस पक्ष आहे. नक्षलवाद्यांसोबत राहून हा पक्ष आणि त्याचे नेते स्वतःच नक्षलवादी बनले आहेत, असेही अमित शाह (Amit Shah) म्हणाले. काँग्रेसच्या काळात नक्षलवाद्यांना सरकारी संरक्षण मिळत होते. ज्या वेळी ७६ जवान हुतात्मा झाले, त्या वेळी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम छत्तीसगडमध्ये आनंद साजरा करत होते, राहुल गांधी आणि यूपीए सरकारच्या काळातील 'नॅशनल ॲडव्हायझरी कौन्सिल'वर नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घातल्याचा ठपका ठेवला.

नक्षलवादाचा रक्ताळलेला 'कालानुक्रम'

अमित शाह (Amit Shah) यांनी नक्षलवादाचा उगम आणि त्याचा विस्तार यावर प्रकाश टाकताना इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) काळातील राजकारणावर थेट भाष्य केले. १९६९ मध्ये नक्षलबारीतून सुरू झालेली ही ठिणगी देशभर पसरण्यास काँग्रेसची सत्तालालसा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. १९७० मध्ये स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी इंदिरा गांधींनी माओवाद्यांचा पाठिंबा घेतल्याचा दावा शाह यांनी केला. ''पोलिसांचीच शस्त्रे लुटून आणि 'रेड कॉरिडॉर' उभारून लोकशाहीला आव्हान देणाऱ्यांना काँग्रेसच्या काळात सरकारी संरक्षण मिळत होते. नक्षलवाद्यांच्या हिंसेला काँग्रेसची विचारसरणी जबाबदार आहे. हा केवळ संसदेतील विषय नाही; निवडणुका होईपर्यंत आम्ही हा मुद्दा जनतेत नेऊ आणि काँग्रेसला याचे उत्तर द्यावेच लागेल,'' असा आक्रमक इशारा अमित शाह यांनी दिला. अमित शाह यांनी छत्तीसगडमधील मागील भूपेश बघेल सरकारवर गंभीर आरोप केले. २० ऑगस्ट २०१९ रोजी आखलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला छत्तीसगडमधील (Chhattisgarh) तत्कालीन काँग्रेस सरकारने सहकार्य केले नाही. काँग्रेस सरकारने नक्षलवाद्यांना संरक्षण दिले. २०२३ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजप सरकार आल्यानंतर मोहिमेला गती मिळाली आहे.

ऑपरेशन 'ऑल-आउट' आणि जवानांचे शौर्य

देशातील नक्षलवादाचे कंबरडे मोडल्याची घोषणा करताना शाह यांनी 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'चा थरार सभागृहासमोर मांडला. ४५ अंश तापमानात, डोंगरदऱ्यांत केवळ ३०० ग्रॅम पाण्यावर २१ दिवस लढणाऱ्या जवानांना त्यांनी कडक सॅल्युट ठोकला. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे २१ पैकी २० सदस्य एकतर मारले गेले आहेत किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. माओवाद्यांचे पॉलिटब्युरो आता पूर्णपणे संपुष्टात आले असून, बस्तरचा भाग आता मुक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासाचा 'बुलेट' वेग विरुद्ध नक्षलवादी हिंसा

'नक्षलवाद गरिबीमुळे नाही, तर नक्षलवादामुळे गरिबी आहे,' हे गृहमंत्र्यांनी आकडेवारीनिशी सिद्ध केले. जिथे नक्षलवाद्यांनी शाळा आणि बँका जाळल्या, तिथे मोदी सरकारने १२,००० किमी रस्ते, ५,००० मोबाईल टॉवर्स आणि १८०० पेक्षा जास्त बँक शाखा सुरू केल्या. नक्षलग्रस्त भागात एकलव्य शाळांच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या हातात बंदुकीऐवजी पेन देण्याचे काम सरकारने केले आहे. नक्षलवादातून बाहेर आलेल्या मुलींच्या डोळ्यांतील पाणी आणि त्यांना मिळणारे नवे आयुष्य, हाच खरा विकास असल्याचे त्यांनी भावूक होऊन सांगितले.

नक्षलमुक्त भारताचा निर्धार

अमित शाह (Amit Shah) यांनी नक्षलवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना शेवटचा इशारा दिला आहे. 'हा मोदींचा काळ आहे; जर तुम्ही संविधानाचा मार्ग सोडून शस्त्रे उचलाल, तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.' ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, नक्षलवाद्यांच्या हिंसेला 'मानवतावादी' म्हणणाऱ्या बुद्धीजीवींचाही त्यांनी तीव्र निषेध केला. '५,००० जवान हुतात्मा झाले तेव्हा तुमचा मानवतावाद कुठे होता?' असा तिखट सवाल त्यांनी विचारला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post