Nepal 2026: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात काठमांडूमधील एक संपूर्ण हॉटेल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या हॉटेलमधून अवघ्या चार तासांपूर्वीच चेक-आऊट करण्यात आले.
त्यामुळे विरारचे माजी नगराध्यक्ष प्रदीप तेंडुलकर यांच्यासह २६ भाविक या थरारक संकटातून थोडक्यात बचावले. प्रदीप तेंडुलकर आणि त्यांचा समूह २५ ऑगस्ट रोजी कैलास-मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाला होता.
काठमांडू येथे पोहोचल्यानंतर तिबेटच्या व्हिसाची प्रतीक्षा करत असताना त्यांनी या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. २५ ऑगस्टच्या सायंकाळी सुमारे ७ वाजता व्हिसा मिळाल्यानंतर त्यांनी २६ ऑगस्ट रोजी पहाटेच हॉटेल सोडले. त्यांनी चेक-आऊट केल्यानंतर अवघ्या चार तासांनी म्हणजेच सकाळी ९ वाजताच्या सुमारास परिसरात भीषण पूर आला आणि त्यात ते संपूर्ण हॉटेल वाहून गेले. सुदैवाने, तोपर्यंत तेंडुलकर आणि त्यांच्यासह असणारे सहप्रवासी सुरक्षितपणे डोल्माला पास येथे पोहोचले होते.
डोल्माला पासवरून कुटुंबियांना पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात तेंडुलकर यांनी आपण सर्व जण सुरक्षित असल्याचे सांगितले. “आम्ही येथे पोहोचणारा शेवटचा गट ठऱलो, त्यानंतर हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. जर आम्हाला व्हिसा मिळण्यास थोडाही उशीर झाला असता, तर आम्हाला हॉटेलमध्येच राहावे लागले असते आणि मोठी दुर्घटना घडली असती”, असे ते म्हणाले.
नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १०६ पर्यटक; ६० जण आज मुंबईत पोहोचणार
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ पर्यटकांपैकी सुमारे ६० पर्यटक मंगळवारी सकाळपर्यंत मुंबईत दाखल होतील, तर उर्वरित 46 नागरिक बुधवारी परतण्याची शक्यता राज्य सरकारने व्यक्त केली आहे. पूर आणि ढगफुटीच्या घटनेनंतर नेपाळ-तिबेट सीमेवर अडकलेल्या महाराष्ट्रातील ४०४ नागरिकांपैकी ३३८जणांशी प्रशासनाचा संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत. मात्र, उर्वरित ६० जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
तिबेट मार्गावर अडकलेले ६९ नागरिक मुंबईकडे रवाना
दरम्यान, तिबेट मार्गावर अडकलेले महाराष्ट्रातील ६९ नागरिक चीनच्या सीमेकडून नेपाळमध्ये दाखल झाले असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. हिंदुस्थानी आणि नेपाळी अधिकाऱ्यांमधील समन्वयामुळे त्यांच्या सुरक्षित परतीचा मार्ग सुकर झाला आहे. यापैकी ४८ नागरिक महाराष्ट्रात दाखलही झाले असून यात ३७ कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समावेश आहे. त्यांना काठमांडूहून रस्तेमार्गे गोरखपूर येथे आणण्यात आले आणि २९ऑगस्ट रोजी विमानाने पुण्यात रवाना करण्यात आले. उर्वरित ११ जण नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील विद्यार्थी आहेत.

