Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nepal Flood चा धोका अजूनही कायम; तब्बल ८ हिमतलाव फुटण्याच्या मार्गावर.

Nepal Flood चा धोका अजूनही कायम; तब्बल ८ हिमतलाव फुटण्याच्या मार्गावर.

नेपाळमध्ये हिमनदी वितळल्याने आणि प्रचंड हिमकडा कोसळल्याने आलेल्या भीषण महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत ३०० हून अधिक भारतीय नागरिकांसह हजारो लोक बेपत्ता झाले आहेत.

उपग्रह छायाचित्रांनुसार, सुमारे ५,२०० मीटर उंचीवरून हिमनदीचा एक मोठा भाग तुटून १,२०० मीटर खोल दरीत कोसळला. त्यामुळे तिथे तयार झालेल्या तात्पुरत्या सरोवराचा नैसर्गिक बांध फुटून नेपाळच्या रसुवा भागात हा विनाशकारी पूर आला. या महापुराचा धोका अजूनही कायम असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, तब्बल ८ हिमतलाव फुटण्याच्या मार्गावर आहे.

रसुवा दुर्घटनेमागील कारणे

५,२०० मीटर उंचीवरून हिमकडा अर्थात बर्फ आणि खडकांचा प्रचंड भाग थेट सरोवरात कोसळला. पाण्याच्या अचानक वाढलेल्या प्रचंड दाबामुळे सरोवराची नैसर्गिक भिंत फुटली. काही मिनिटांतच लाखो लिटर पाणी, बर्फ आणि चिखलाचा ढिगारा घेऊन सखल भागाकडे वेगाने वाहू लागले.

( Nepal Flood : चीन म्हणाला, नेपाळमध्ये पुराचा धोका अजून टळला नाही; तीन दिवस धोक्याचे…)

हिमनदी सरोवर म्हणजे काय?

तापमानवाढीमुळे जेव्हा हिमनदी वितळते आणि मागे सरकते, तेव्हा तिच्या काठावर बर्फ, खडक आणि मातीचे नैसर्गिक धरण तयार होऊन पाणी साचू लागते; याला हिमनदी सरोवर (Glacial Lake) म्हणतात. पाण्याचा दाब वाढल्याने, भूकंपामुळे, भूस्खलनामुळे किंवा हिमस्खलनामुळे हे नैसर्गिक धरण कमकुवत होऊन अचानक फुटते. धरण फुटल्यानंतर सरोवरातील पाणी प्रचंड वेगाने सखल भागाकडे वाहू लागते. या प्रक्रियेला ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF) म्हणतात. या पुरात केवळ पाणी नसून दगड, बर्फ आणि चिखलाचा मोठा ढिगारा असतो. त्यामुळे मार्गातील गावे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्प क्षणार्धात उद्ध्वस्त होतात.

पोईकु खोरे आणि तिबेटमधील धोकादायक सरोवरे

केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आणि ‘जर्नल ऑफ ग्लेशियोलॉजी’मधील संशोधनानुसार, तिबेटमधील पोईकु नदी खोऱ्यात १९६४ ते २०१७ दरम्यान हिमनदी सरोवरांच्या क्षेत्रफळात ११० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. पोईकु नदी पुढे नेपाळमध्ये भोटे कोशी आणि सुन कोशी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तिबेटमधील घडामोडींचा थेट परिणाम नेपाळ आणि भारतावर होतो. ज्या तलावांचे क्षेत्रफळ १५० टक्क्यांहून अधिक वाढले आहे, अशा आठ सरोवरांना अत्यंत संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. त्यामध्ये गालोंग्को, गांगशिको, जियालोंग्को, सिरेनमाको, ताराको, बेइहू, कावुकुडेन्को, युमोझान अशी त्या तलावांची नावे आहेत. हवामान बदलामुळे हिमालयातील नैसर्गिक बंधारे कमकुवत होत असून, भविष्यात भारत आणि नेपाळमधील सखल भागांसाठी हा धोका अधिक गंभीर बनत चालला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post