Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
OpenAI ChatGPT ads : भारतात चॅट-जीपीटीवर आता जाहिराती सुरू, ओपन एआयची महसूलासाठी योजना

OpenAI ChatGPT ads : भारतात चॅट-जीपीटीवर आता जाहिराती सुरू, ओपन एआयची महसूलासाठी योजना

  • ऋजुता लुकतुके

OpenAI ChatGPT ads : चॅट जीपीटी आता भारतात जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार आहे. ओपन एआयने आपल्या मोफत आणि गो या दोन्ही योजनांवर लॉग-इन केलेल्या यूजर्ससाठी चॅट जीपीटी जाहिरातींचं मॉडेल आणलं आहे.

कंपनीसाठी भारत ही अमेरिकेनंतरची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे हा निर्णयही कंपनीसाठी महत्त्वाचा आहे.

यूजरने चॅटजीपीला एखादा प्रश्न विचारल्यानंतर उत्तराच्या खाली स्पॉन्सर्ड म्हणून जाहिरात दिसू शकते. ती चॅटजीपीटीच्या उत्तरापासून वेगळी आणि स्पष्टपणे लेबल केलेली असेल. जाहिराती मोफत आणि गो प्लानसाठी आहेत. प्लस, प्रो, बिझिनेस आणि एंटरप्राईज तसंच एड्युकेशन प्लान हे जाहिरात मुक्त राहतील.

भारतामध्ये सुरुवातीला ५० पेक्षा जास्त ब्रँड्स चॅटजीपीटीवर जाहिराती दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. कंपनीने डब्ल्यूपीपी आणि ओमनीकॉम या कंपन्यांना जाहिरातींसाठी कंत्राट दिलं आहे.

ओपन एआय भारतात ४ सप्टेंबरपासून सेल्फ सर्व्ह चॅटजीपीटी ॲड मॅनेजर उपलब्ध करून देणार आहे. कंपन्यांना स्वतःच्या जाहिरात मोहिमा तयार करता येतील आणि दररोज ₹७२५ पासून बजेट सुरू करता येईल, असे अहवालात म्हटले आहे.

याचा अर्थ चॅटजीपीटी हळूहळू पारंपरिक सर्च इंजिन किंवा सोशल मीडिया व्यासपीठ प्रमाणे जाहिरातदारांसाठी आणखी एक महत्त्वाचे डिजिटल डिस्कव्हरी व्यासपीठ बनू शकते.

फेब्रुवारी २०२६पर्यंत भारतात चॅटजीपीचीचे १० कोटींपेक्षा जास्त ग्राहक असल्याचे ओपन एआयने सांगितले आहे. विद्यार्थी, डेव्हलपर्स, एड्युकेटर्स आणि एंटरप्राईजेस यांच्याकडून चॅटजीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

( – Serena Venus Williams US Open 2026 : सेरेना आणि व्हिनस विल्यम्स पुन्हा एकत्र, युएस ओपनमध्ये दुहेरी खेळणार )

विशेष म्हणजे भारतातील दर आठवड्याला चॅट जीपीटीचा नियमित वापर करणारे लोक दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे भारतीय यूजर चॅटजीपीटीचा वापर केवळ माहिती शोधण्यासाठी करत नाही, तर पर्यायांची तुलना, निर्णय घेणे आणि खरेदीपूर्वी संशोधन करण्यासाठीही करत आहे. जाहिरातदारांसाठी हा डेटा अत्यंत मौल्यवान आहे.

ओपन एआयचा दावा आहे की जाहिराती आणि चॅटजीपीटीचे उत्तर देणारे मॉडेल स्वतंत्र प्रणालींवर चालतील. जाहिरातदारांना चॅटजीपीटीच्या उत्तरांचा क्रम बदलण्याची किंवा उत्तरावर प्रभाव टाकण्याची क्षमता नसेल.

तसेच जाहिरातदारांना यूजरच्या चॅट्स, चॅट हिस्टरी, मेमरीज किंवा वैयक्तिक माहिती उपलब्ध होणार नाहीत. जाहिरातदारांना प्रामुख्याने एकत्रित ऑनलाईन मोहिमांसाठीचा डेटा जसे इम्प्रेशन व क्लिक्स यांचा डेटा मिळेल.

इथे या निर्णयामागचे मोठे व्यावसायिक गणित आहे.

चॅटजीपीटीचे कोट्यवधी यूजर्स मोफत किंवा कमी किमतीच्या प्लॅनवर आहेत. दुसरीकडे एआय मॉडेल्स चालवण्यासाठी डेटा सेंटर, जीपीयू, वीज आणि पायाभूत सुविधांवर प्रचंड खर्च होतो. ओपनएआय याआधीच स्पष्ट केले आहे की जाहिरातींच्या माध्यमातून मोफत आणि कमी किमतीच्या योजनांचा विस्तार टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

ओपन एआयचा महसूल जून २०२६ला संपलेल्या तिमाहीत ६.७ अब्ज अमेरिकन डॉलर इतका झाला, मात्र त्याच काळात तोटाही १२.३ अब्ज कोटींवर पोहोचला होता. त्यामुळे महसूलाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचा दबाव स्पष्ट आहे. चॅटजीपीटीवरील जाहिरातींची सुरुवात ही केवळ एका एआय ॲपमध्ये जाहिराती येण्याची बातमी नाही. गुगल सर्चनंतर आता एआय कन्व्हरसेशन स्वतःच जाहिरातींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ बनण्याची शक्यता यातून दिसते.

यूजर एखादे उत्पादन विकत घेण्यापूर्वी चॅटजीपीटीला विचारतो, पर्यायांची तुलना करतो आणि निर्णय घेतो-म्हणजे जाहिरातदाराला यूजरच्या निर्णय प्रक्रियेच्या अगदी जवळ पोहोचण्याची संधी मिळते.

आणि म्हणूनच भारतातील चॅट जीपीटी ॲड्स हा ओपन एआयच्या महसूल रणनीतीचा एक मोठा प्रयोग आहे. पुढचा प्रश्न मात्र महत्त्वाचा असेल-एआयवर विश्वास ठेवून घेतलेल्या निर्णयांच्या मध्ये जाहिराती किती दूरपर्यंत येऊ शकतात?

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post