Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंजाबच्या ड्राफ्ट व्होटर लिस्टमधून नाव वगळल्याने Raghav Chadha आक्रमक! 'कायमचे स्थलांतरित' अशी नोंद; म्हणाले.

पंजाबच्या ड्राफ्ट व्होटर लिस्टमधून नाव वगळल्याने Raghav Chadha आक्रमक! 'कायमचे स्थलांतरित' अशी नोंद; म्हणाले.

Raghav Chadha Name Removed from Voter List : पंजाबमध्ये निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर (SIR) मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ड्राफ्ट मतदार यादीतून राज्यसभेचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadha) यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

त्यांच्या नावापुढे 'कायमचे स्थलांतरित' (Permanently Shifted) अशी नोंद करण्यात आली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान पंजाबमधील आतापर्यंत सुमारे २०.६६ लाख मतदारांची नावं ड्राफ्ट मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. ही संख्या एसआयआरपूर्वीच्या राज्यातील एकूण मतदारांच्या सुमारे ९.७ टक्के आहे.

राघव चड्डा यांचा संताप

ड्राफ्ट मतदार यादीतून आपलं नाव वगळण्यात आल्याच्या प्रकारावर राघव चड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून प्रतिक्रिया दिली. आपण पंजाबमधून राज्यसभेचे खासदार असून आपलं मतदार ओळखपत्र मोहाली येथे नोंदणीकृत असल्याचं त्यांनी म्हटलं. "मी पंजाबमधून राज्यसभेचा खासदार आहे आणि माझं मतदार ओळखपत्र मोहालीमध्ये नोंदणीकृत आहे. तरीही ड्राफ्ट मतदार यादीत माझं नाव 'स्थलांतरित' व्यक्ती म्हणून दाखवण्यात आलं आहे," असं चड्डा यांनी म्हटलं.

'हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार'

ही अंतिम मतदार यादी नसून ड्राफ्ट यादी असल्याचंही राघव चड्डा यांनी स्पष्ट केलं. 'दावे आणि हरकती' प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांमध्ये आवश्यक सुधारणा केली जाते आणि ही प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. अंतिम मतदार यादी ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रसिद्ध होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. एसआयआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपलब्ध असलेल्या उपायांचा वापर करण्याची प्रक्रिया आपण सुरू केली असल्याचं सांगत चड्डा यांनी या प्रकारामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. "ही केवळ क्लार्कची चूक वाटत नाही. हा स्पष्टपणे राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे," असा दावा त्यांनी केला.

पंजाब सरकारवरही निशाणा

राघव चड्डा यांनी पंजाबमधील भगवंत मान सरकारवरही गंभीर आरोप केले. मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेत तळागाळातील बीएलओ (BLO) पासून पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत विविध स्तरांवर पंजाब सरकारचे अधिकारी कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलं. बीएलओ, एईआरओ (AERO), ईआरओ (ERO) आणि डीईओ (DEO) हे अधिकारी राज्य प्रशासनाशी संबंधित असल्याचा दावा करत त्यांनी या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले. पंजाब कॅडरमधील आयएएस अधिकारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

निवडणूक कर्तव्य पार पडल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोस्टिंग आणि करिअरशी संबंधित बाबींवर राज्य सरकारचा प्रभाव असतो, असा आरोप चड्डा यांनी केला. याच प्रभावाचा वापर करून आप सरकार राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राजकीय दबाव निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, राघव चड्डा यांचं नाव ड्राफ्ट मतदार यादीतून वगळण्यात आलं असलं तरी 'दावे आणि हरकती' प्रक्रियेदरम्यान त्यांना आपला दावा सादर करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीत त्यांच्या नावाचा समावेश होतो का, याकडे लक्ष लागलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post