Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

परकीय नावे हद्दपार! महामार्गांवर आता 'छत्रपती संभाजीनगर', 'अहिल्यानगर'; Hindu Janajagruti Samiti कडून पाठपुरावा

Hindu Janajagruti Samiti राज्य शासनाने आपला गौरवशाली इतिहास जपण्यासाठी अनेक शहरांची परकीय आणि जुनी नावे पालटून त्यांना नवीन अधिकृत नावे दिली आहेत. यामध्ये 'औरंगाबाद'चे 'छत्रपती संभाजीनगर', 'अहमदनगर'चे 'अहिल्यानगर', 'उस्मानाबाद'चे 'धाराशिव', तसेच 'इस्लामपूर'चे 'ईश्वरपूर' आणि 'वेल्हे'चे 'राजगड' असे नामकरण करण्यात आले आहे; मात्र महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अद्यापही औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद अशी जुनीच आणि परकीय नावे सर्रास झळकत आहेत.

ही जुनी नावे तत्काळ हटवून त्याजागी शासनाने मंजूर केलेली नवीन नावे लिहावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याची गंभीर दखल घेत मंत्री महोदयांनी ‘ही नावे बदललीच पाहिजेत, यामध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना आदेश देऊन आजच कारवाई करण्यासाठी सांगतो, असे आश्वासनही त्यांनी दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे. (Hindu Janajagruti Samiti)

अशाच प्रकारचे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही दिले आहेत. राज्य शासनाने रीतसर शासन निर्णय व राजपत्र प्रसिद्ध करून या नवीन नावांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे. एकदा राजपत्र काढून नावात बदल केल्यानंतर सर्व शासकीय दप्तरी आणि सार्वजनिक फलकांवर नवीन नावांचा वापर करणे प्रशासनाला कायदेशीररित्या बंधनकारक असते. असे असतानाही जुन्या नावांचे फलक तसेच ठेवणे, हा अधिकृत शासकीय निर्णयाचा एक प्रकारे प्रशासकीय अवमान आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीनुसार दिशादर्शक फलक अद्ययावत नसणे ही प्रवाशांची दिशाभूल असून, राजपत्रित आदेशाचे पालन न करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची थेट ‘कर्तव्यकसुरी’ ठरते, असे समितीने निवेदनात सडेतोडपणे स्पष्ट केले आहे. (Hindu Janajagruti Samiti)

दिशादर्शक फलकांवरील नावांचा हा विषय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी जुने फलक हटवून नवीन नावे अद्ययावत करण्याबाबत तात्काळ ‘परिपत्रक’ काढावे, अशी आग्रही मागणी समितीने केली आहे. या वेळी निवेदन देताना समितीचे मुंबई येथील सतीश सोनार आणि रवींद्र नलावडे प्रामुख्याने उपस्थित होते. (Hindu Janajagruti Samiti)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post