Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीक विमा अर्जाची मुदत वाढली; आता 'या' तारखेपर्यंत संधी

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीक विमा अर्जाची मुदत वाढली; आता 'या' तारखेपर्यंत संधी

  • विशेष प्रतिनिधी

PM Kisan Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने (State Govt) प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलैवरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे.

तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची अपूर्णता आणि इतर कारणांमुळे अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी दिली.

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, राज्यभरातील शेतकऱ्यांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र, कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने अर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाडा विभागातून सर्वाधिक, तर कोकण विभागातून सर्वात कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. विभागनिहाय नोंदणीमध्ये कोकण विभागातून १ लाख २ हजार ३३५, नाशिक विभागातून ३ लाख ३३ हजार ३८५, पुणे विभागातून ६ लाख ७ हजार ६६३, कोल्हापूर विभागातून २ लाख ४० हजार २५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३ लाख २५ हजार, लातूर विभागातून २ लाख ४२ हजार ८२६, अमरावती विभागातून ६ लाख ९१ हजार ९७३ आणि नागपूर विभागातून ४ लाख ५३ हजार ३८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्टपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, हवामानातील अनिश्चितता आणि एल निनोच्या (El Nino) संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट आणि इतर प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवून देणारी ही महत्त्वाची योजना असल्याने पात्र शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा.

शेतकरी PMFBY Crop Insurance App किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PM Kisan Scheme) अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. कृषी विभागाने सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post