Devendra Fadnavis : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-UBT) पक्षातील काही खासदारांच्या पक्षांतरानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
अशातच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानांवरुन, फडणवीसांनी त्यांना आपल्या खास मिश्कील शैलीत उत्तर दिले आहे. “हे सगळं प्रेम मला २०१९ ला हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला, आता प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला…” असं म्हणत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.
अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदारांनी बाजू बदलली.यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) ऐवजी हे ‘ऑपरेशन फडणवीस’ असल्याचा आरोप केला होता.तसेच, त्यांनी दिल्लीतील समीकरणांवर भाष्य करताना “देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ,” अशी मवाळ भूमिकाही मांडली होती.उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या याच अचानक ‘प्रेमा’वर मुख्यमंत्र्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले…
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर उत्तर देताना फडणवीसांनी एका हिंदी गाण्याचा दाखला दिला. ते म्हणाले: “हिंदीमध्ये एक गाणं आहे… ‘माना की तेरे जहाँ में ये नहीं की प्यार नही मिलता, पर जब चाहिए तब नही मिलता.’ हे सगळं प्रेम मला २०१९ ला हवे होते.तेव्हा आमचा प्रेमभंग झाला आहे.आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे.प्रेमभंगानंतर आम्ही दुसरे लग्न केले, संसार थाटला, आमच्या नव्या लग्नाचे वाढदिवसही साजरे झाले! आता त्यात काय शिल्लक राहिलं आहे?“
तसेच मित्रपक्षाच्या राजकीय हालचालींवर बोलताना, “जर आमचा मित्रपक्ष एखादं राजकीय ऑपरेशन करत असेल, तर आम्ही त्यांना का थांबवू? आणिज्यांनी वेळप्रसंगी आमची साथ सोडली, त्यांच्यासाठी आम्ही का धावून जाऊ,” असा थेट सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या गमतीशीर पण तितक्याच खोचक टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरांच्या चर्चेला उधाण आले आहे.
2019 च्या राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी
- ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले.
- भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले, मात्र मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला.
- शिवसेनेने भाजपपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली.
- त्यानंतर राज्यात अनेक मोठे राजकीय बदल झाले. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, तर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही विभाजन झाले.
- सध्या भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची महायुती राज्यात सत्तेत आहे.
: Solapur ZP Schools : सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवी होणार सुरू
