ऋजुता लुकतुके
Rahul Dravid भारतीय क्रिकेटमधील ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा मुलगा संमित द्रविड सध्या महाराजा करंडक केएससीए टी-२० स्पर्धेत आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे.
कल्याणी बंगळुरू ब्लास्टर्सकडून खेळताना समितने हुबळी टायगर्सविरुद्ध खेळलेली ३२ धावांची खेळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मात्र या खेळीपेक्षा त्याची फलंदाजीची शैलीच क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरली आहे. (Rahul Dravid)
हुबळी येथे झालेल्या सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्सची सुरुवात खराब झाली. अवघ्या आठ चेंडूंमध्ये दोन गडी बाद झाल्यानंतर समित फलंदाजीला आला. अशा दबावाच्या परिस्थितीत त्याने २३ चेंडूंत ३२ धावांची संयमी आणि तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट खेळी केली. या डावात त्याने सहा चौकार लगावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर बंगळुरूने २०३ धावांचा मजबूत डोंगर उभा केला आणि अखेर दोन धावांनी रोमांचक विजय मिळवला. (Rahul Dravid)
समितची फलंदाजी पाहताना अनेकांना राहुलच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. उंच डावा कोपर, स्थिर उभे राहण्याची पद्धत, अचूक बचाव, सरळ बॅट आणि कव्हर ड्राइव्हमधील सहजता यामुळे चाहत्यांनी त्याची तुलना थेट राहुलशी केली. सोशल मीडियावर अनेकांनी त्याला “ज्युनिअर वॉल” अशी उपाधीही दिली. (Rahul Dravid)
महाराजा करंडकातील सात सामन्यांत समितने चार डावांत ११२ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १३८ पेक्षा अधिक आहे. यापूर्वी त्याची सर्वोच्च धावसंख्या ३९ होती. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. (Rahul Dravid)
राहुल द्रविडच्या नावाचा वारसा लाभला असला, तरी समित स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर राहुलच्या सुवर्णकाळातील तंत्रशुद्ध फलंदाजीची आठवण अनेकांना झाल्याचे सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समितची ही खेळी केवळ धावांसाठी नव्हे, तर त्याच्या शैलीसाठीही दीर्घकाळ स्मरणात राहील. (Rahul Dravid)
