प्रतिनिधी
Railway Passenger Safety मुंबईसह संपूर्ण राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. रेल्वे स्थानके आणि परिसरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष कृती आराखडा तयार केला असून, याअंतर्गत रेल्वे पोलिसांच्या मदतीने धडाकेबाज मोहीम राबवण्यात येणार आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत ही घोषणा करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना इशारा दिला आहे. (Railway Passenger Safety)
रेल्वेतील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, सरकारने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. सर्व प्रमुख स्थानकांवर फेस रेकग्निशन तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे अधिक विस्तारले जाणार आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारी रोखण्यासाठी संवेदनशील ठिकाणांना ‘झोन’मध्ये विभागून तिथे संयुक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षिततेचा अहवाल तातडीने सरकारला सादर करणार आहेत. (Railway Passenger Safety)
रेल्वे स्थानकांवर बिनधास्त वावरणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि सक्रिय टोळ्यांविरोधात सरकार आता कठोर पवित्रा घेणार आहे. कायद्याची चौकट पाळून त्यांच्यावर मकोकासारखी कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्यमंत्री कदम यांनी दिले आहेत. तसेच, महिला प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रात्रीची विशेष सुरक्षा सुविधा सकाळी ८ वाजेपर्यंत वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे. (Railway Passenger Safety)
पुढील १५ दिवसांत रेल्वे पोलीस आयुक्तांसोबत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये रेल्वे परिसरातील सुरक्षेचा सखोल आढावा घेतला जाईल. तसेच, येत्या ५ दिवसांत रेल्वेतील गुन्हेगार आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांविरोधात आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवालही सादर केला जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही देत सरकारने आता रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. (Railway Passenger Safety)
