पुणे शहरासह उपनगरात दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी भागांत गारांसह पाऊस (Rain) पडला.
मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. शहरात सोमवारपासून गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे. दररोज दुपारपर्यंत वातावरण गरम असते. त्यानंतर पावसाला सुरुवात होते. अशा वातावरणामुळे पावसाळा (Rain) सुरु झाल्यासारखे पुणेकरांना वाटू लागले आहे.
मंगळवारी आकाश दिवसभर ढगाळ होते. पण, पावसाने विश्रांती घेतली. बुधवारी शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाड्यातही वाढ झाली होती. दुपारनंतर तीनच्या सुमारास वारा सुटला आणि उपनगरांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर गुरुवारी दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता. त्यानंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. कात्रज-सातारा रस्त्यावर गारा पडत असताना कोथरूड, कर्वेनगर- कर्वे रस्त्यावर ऊन पडले होते. तासाभरानंतर तिथे पावसाला (Rain) सुरुवात झाली. तर डेक्कन-शिवाजीनगर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा वाढला होता. बुधवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात ०.४ मिलिमीटर तर लोहगावमध्ये ३२.६ मिलिमीटर पाऊस पडला. या हंगामात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा गारांसह पावसाची नोंद झाली.
