मे महिना संपून आता जून महिन्याला सुरुवात होत आहे. या नवीन महिन्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि आर्थिक व्यवहारांशी निगडित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. यामध्ये डिजिटल पेमेंट, बँकिंग व्यवहार, कर प्रणाली आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींचा समावेश आहे.
या नवीन नियमांची योग्य माहिती नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर याचा थेट विपरीत परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक फटका सोसावा लागू शकतो. (Rule Change 1st June)
युपीआय फसवणुकीला लगाम आणि एटीएम शुल्क बदल
डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी जून महिन्यापासून मोठा बदल होणार आहे. आता ऑनलाईन पैसे पाठवताना समोरच्या व्यक्तीचे केवळ बँकेत नोंदणीकृत असलेले मूळ नावच पडद्यावर दिसणार आहे, ज्यामुळे चुकीच्या खात्यावर पैसे जाणे किंवा होणारी आर्थिक फसवणूक टाळता येईल. दुसरीकडे, काही बँकांकडून एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत आणि विनाशुल्क व्यवहारांनंतर लागणाऱ्या शुल्कात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तसेच खात्यावरील शिल्लक तपासणे आणि संक्षिप्त विवरणपत्र मिळवण्याच्या शुल्कातही वाढ होऊ शकते. (Rule Change 1st June)
प्राप्तिकर आणि गॅस सिलेंडरच्या दरांचे नवे गणित
चालू आर्थिक वर्षातील अग्रिम कराचा (Advance Tax) पहिला हप्ता भरण्याची अंतिम मुदत १५ जून रोजी संपत आहे. ज्या करदात्यांचे वार्षिक दायित्व दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना एकूण कराच्या १५ टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. याशिवाय, इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांचे पुनरावलोकन केले जाते. या नवीन दरांचा थेट परिणाम स्वयंपाकघराच्या खर्चावर होणार आहे. उच्च मूल्याच्या रोख व्यवहारांसाठी आता स्थायी खाते क्रमांक (PAN) सादर करण्याचे नियम देखील अधिक कडक करण्यात आले आहेत.
