ऋजुता लुकतुके
Shahrukh Khan बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या नाईट रायडर्स समूहाने क्रिकेटविश्वात मोठी कामगिरी केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसजवळील पोमोना येथे ‘नाईट रायडर्स क्रिकेट ग्राऊंड’ उभारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणारी पहिली जागतिक क्रिकेट फ्रँचायझी बनण्याचा मान नाईट रायडर्सने मिळवला आहे.
या मैदानावर मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्याचेही आयोजन करण्यात आले. (Shahrukh Khan)
नव्या स्टेडियमवर लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यामुळे केवळ नव्या मैदानाचे उद्घाटनच झाले नाही, तर अमेरिकेतील क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेलाही नवे बळ मिळाले. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार असल्याने या मैदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Shahrukh Khan)
या स्टेडियममध्ये आठ खेळपट्ट्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आणि १२० फूट उंचीचे सहा फ्लडलाइट टॉवर उभारण्यात आले आहेत. मैदानाच्या निर्मितीसाठी ३२ हजार मेट्रिक टनांहून अधिक माती हलवण्यात आली. भविष्यात प्रेक्षक क्षमता वाढवण्याचाही नाईट रायडर्स समूहाचा मानस आहे. (Shahrukh Khan)
स्टेडियमच्या उद्घाटनानंतर शाहरुखने आनंद व्यक्त करत, “स्वप्न म्हणून सुरू झालेला प्रवास आज प्रत्यक्षात उतरला आहे. लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेटसाठी कायमस्वरूपी घर निर्माण करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे केवळ क्रिकेट मैदान नाही, तर कुटुंबे, चाहते आणि स्थानिक समुदायाला एकत्र आणणारे केंद्र असेल,” असे म्हटले. त्याने या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि अध्यक्ष जय शाह यांचेही आभार मानले. (Shahrukh Khan)
नाईट रायडर्स समूहाकडे इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स, कॅरिबियन प्रीमियर लीगमधील त्रिनबागो नाईट रायडर्स, यूएईतील अबूधाबी नाईट रायडर्स आणि अमेरिकेतील लॉस एंजेलिस नाईट रायडर्स अशा अनेक संघांची मालकी आहे. अमेरिकेत स्वतःचे क्रिकेट स्टेडियम उभारून समूहाने जागतिक क्रिकेट विस्ताराच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. (Shahrukh Khan)
