- कल्याण : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमीच्या संघर्षाला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर भगवान महादेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महादेव मंदिरात संकल्पपूर्ती पूजा आयोजित करण्यात आली आहे.
उद्या सोमवारी १ जून रोजी पहाटे ४ वाजता संपन्न होणार आहे. पिंपळेश्वर महादेव भक्त आणि डोंबिवलीचे (Dombivli) आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या हस्ते संकल्पपूर्ती पूजन संपन्न होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी डोंबिवलीकर भाविक, ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पिंपळेश्वर मंदिरभूमीची अनेक वर्षांची लढाई अखेर यशस्वी ठरली आहे. देवस्थान समिती, शिवभक्त आणि ग्रामस्थांच्या श्रद्धेचा विजय झाला आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिर हा डोंबिवलीकर ग्रामस्थांच्या वैयक्तिक आस्थेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा विषय आहे. मंदिराच्या जागेसाठीचा संघर्ष गेली १४ वर्षे सातत्याने सुरू होता. या संपूर्ण लढ्यात भाजपा (BJP) ग्रामस्थांसोबत खंबीरपणे उभी राहिली. या आंदोलनाला बळ देण्यासाठी २० ऑगस्ट २०१२ रोजी भाजपाने डोंबिवली बंदची हाक दिली होती. अखेर या लढ्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिर संकल्पपूर्ती पूजा आयोजित करण्यात आली आहे.
