मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रभादेवी पुलाचे बांधकाम आणि ठाणे-डोंबिवली दरम्यानच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने शनिवार ४ एप्रिलच्या रात्रीपासून रविवारी ५ एप्रिलच्या सकाळपर्यंत विशेष ब्लॉक (Block) जाहीर केला आहे.
(Sunday Megablock Update)
मिळालेल्या माहितीनुसार या काळात दादर भायखळादरम्यान शनिवारी रात्री ११.१५ ते पहाटे ५.४५ दरम्यान ब्लॉक असेल. दादर यामुळे सीएसएमटी लोकल शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६ दरम्यान बंद असेल. काही लोकल रद्द, तर काही दादर किंवा कुर्ला येथेच समाप्त केल्या जातील किंवा तिथून सुरू होतील. तसेच मुलुंड – ठाणे आणि दिवा -डोंबिवलीदरम्यान धीम्या मार्गावर शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० दरम्यान ब्लॉक राहील.
यामुळे रात्री १०.४९ ते रात्री १२.३३ वाजता दादरहून आणि पहाटे ४.४५ वाजता विद्याविहारहून सुटणाऱ्या तसेच सकाळी ९.०५ वाजता सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या लोकल, मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान जलद मागांवर वळवण्यात येतील. तसेच शनिवारी रात्री ११.२६ ते ११.५२ आणि रविवारी ३.२३ ते सकाळी ९.५५ दरम्यान कल्याण येथून सुटणाऱ्या धीम्या लोकलही अशाच वळवण्यात येतील. यावेळी कोपर ठाकुर्ली येथे लोकल थांबणार नाहीत.
प्रभादेवी पुलाचे पाडकाम आणि १० तासांचा ब्लॉक
प्रभादेवी पुलाचे पॅनल काढण्यासाठी शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य ब्लॉक घेतला जाईल. या प्रक्रियेमुळे शेवटची लोकल रात्री १०.३० वाजता सोडली जाणार आहे. तसेच, ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत १० तासांचा विशेष ब्लॉक असेल. या काळात कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत, तर अनेक गाड्या कुर्ला किंवा दादर स्थानकावरच थांबवल्या जातील.
हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरही परिणामरविवारी हार्बर मार्गावरही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल-सीएसएमटी आणि ट्रान्स-हार्बरवरील पनवेल-ठाणे सेवा रद्द असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील, तर बेलापूर आणि उरण दरम्यानची वाहतूक नियमित सुरू राहील. सुमारे ३० लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : मुंबई सेंट्रल आणि माहीम जलद मार्गावर
कधी : शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.१५
परिणाम : या कालावधीत सर्व जलद मार्गावरील लोकल सांताक्रूझ आणि चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
