Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुट्टीच्या दिवशीही Kalyan 'जाम'! अर्धा-पाऊण तास वाहने एकाच जागेवर; रुग्णवाहिकाही अडकली!

सुट्टीच्या दिवशीही Kalyan 'जाम'! अर्धा-पाऊण तास वाहने एकाच जागेवर; रुग्णवाहिकाही अडकली!

  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण (Kalyan) शहरातील वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना बसत आहे. वाहतूक नियंत्रण विभागाच्या (Traffic Control Department) नियोजनशून्य कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करत कल्याणकर नेटकऱ्यांनी समाज माध्यमांद्वारे वाहतूक नियंत्रण करण्यात हतबल ठरलेल्या पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील दुर्गाडी चौक, लाल चौकी, सहजानंद चौक आणि खडकपाडा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुट्टीच्या दिवशी शहरातील रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ असते. मात्र दुपारपासूनच या सर्व प्रमुख चौकांमध्ये वाहने एकाच जागी अर्धा ते पाऊण तास अडकून पडल्याचे चित्र होते. यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनचालकांना मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागले.

वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे मुश्किल झाले होते. तर रूग्णवाहिकेलाही कोंडीतून वाट काढताना कसरत करावी लागल्याचे काही पादचाऱ्यांनी सांगितले. कल्याणची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना वाहतूक नियंत्रण विभागाकडून मात्र कोणतेही ठोस नियोजन केले जात नसल्याची खंत कल्याणकर व्यक्त करत आहेत.

या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच कल्याणकर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि इंस्टाग्रामवर वाहतूक नियंत्रण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड घेण्यात आली आहे. बेशिस्त पार्किंग, अपुरी मनुष्यबळ, बंद असलेले सिग्नल आणि केवळ दंड वसुलीवर भर देणाऱ्या धोरणामुळे कल्याणात वाहतुकीचा बोजवारा उडाला असल्याची टीका होत आहे. सुट्टीच्या दिवशीच जर ही अवस्था असेल तर कामाच्या दिवशी काय परिस्थिती असेल, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post