Tejas Express : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ या दोन प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामासाठी सीएसएमटीतील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची मुदत १३ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या तेजस एक्सप्रेससह अनेक गाडय़ा सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. परिणामी, प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीद्वारे (RLDA) सीएसएमटीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी यापूर्वी १ फेब्रुवारी ते २६ एप्रिलपर्यंत ब्लॉक लागू करण्यात आला होता. नंतर त्याची मुदत १९ मेपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यात आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७वर पायाभूत कामे आणि इतर आवश्यक कामे केली जातील, असे मध्य रेल्वेने बुधवारी (२७ मे) जाहीर केले.
या गाड्यांचा दादरमध्ये प्रवास समाप्त
सीएसएमटीऐवजी दादर स्थानकात प्रवास समाप्त होणाऱ्या गाड्यांमध्ये अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, बल्लारशाह-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस, बिदर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, लातूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
