- कल्याण : प्रतिनिधी
Train Accident : दिव्याहून भिवंडीकडे कामावर निघालेल्या १९ वर्षीय तरूणाचा रेल्वेतून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास कोपर (Kopar) ते डोंबिवली (Dombivli) स्थानकांच्या दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी किशोर कुवळेकर (१९) असे या तरूणीचे नाव असून ती दिवा पूर्वेकडील टाटा पॉवर रोड परिसरात असलेल्या वक्रतुंड नगरात राहत होती. रविवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही तरूणी दिव्याहून डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करत होती. रेल्वेतून पडून तिला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी केडीएमसीच्या (KDMC) डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात (Shastrinagar Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले. शास्त्रीनगर रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर तेजस्वीचा मृतदेह तिचे वडील किशोर कृष्णा कुवळेकर (४२) यांच्या ताब्यात देण्यात आला. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. रेल्वेतून पडून तेजस्वीचा मृत्यू झाल्याने ती राहत असलेल्या वक्रतुंड नगरावर शोककळा पसरली आहे. गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवास करताना होणाऱ्या अपघातांच्या घटना वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी
दिव्यात राहणारी मुलगी भिवंडीला कामावर जाण्यासाठी निघाली होती. ती कोपर ते डोंबिवली दरम्यान मृत्युमुखी पडली. ती कशी पडली याचे कारण सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने देता येत नसल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. रविवार असल्यामुळे लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण कमी असते. मग असे अपघात कसे काय घडतात ? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे डबे आणि प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

