- विशेष प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आपला धडाकेबाज पवित्रा स्पष्ट केला आहे. पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या काही दिवसांतच त्यांनी बाबा रामदेव (Ramdev) यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’च्या दिव्य फार्मसीवर मोठी कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे.
ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि औषधांच्या नावाखाली ‘चमत्कारी’ दावे करणाऱ्या पतंजलीच्या (Patanjali) तब्बल ७३ लाख २५ हजार रुपयांच्या औषधांचा साठा प्रशासनाने जप्त केला आहे.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या औषधांच्या जाहिरातींमध्ये अत्यंत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांचा वापर करण्यात आला होता. कॅन्सर, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांवर हमखास उपचारांची हमी देणे आणि कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय चमत्कारी गुणधर्मांचा प्रचार करणे, हे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, दोषींवर थेट न्यायालयात खटला चालवण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ तीन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय मोहीम उघडली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभागात आतापर्यंत ५३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये भेसळ करणाऱ्या ३३ जणांना अटक करण्यात आली असून, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही बड्या संस्थेला वा व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा सज्जड दम मुंढे यांनी दिला आहे. ही कारवाई आता राज्यातील इतर कंपन्या आणि विक्रेत्यांसाठी एक मोठा इशारा मानली जात आहे.
हेही पहा –
