अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात हॉटेल्स, खाद्यपदार्थ बनवणारी दुकानांवर छापे टाकले जात आहेत. पुण्यातही एफडीएकडून प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. मथुरा प्युअर व्हेज हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिलेत.
तर ७ हॉटेल्सचे परवानेही निलंबित केले आहेत. अन्न पदार्थांचे नमुने तपासासाठी घेण्यात आले असून अहवाल येईपर्यंत हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांना शुद्ध अन् सुरक्षित अन्न मिळावे यासाठी सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहिम तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुणे विभागात हॉटेल चालकांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतलीय. १ ते ३ जुलै रोजी राज्यात ७० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर छापे टाकण्यात आले.
अहवाल येईपर्यंत हॉटेल्स बंद
पुण्यातील हॉटेल्सवर जिथे छापे टाकले तिथे अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलंय. स्वयंपाकघरात अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचं अन्न आणि मुदत संपलेला अन्नसाठा होता अशी माहिती समोर येतेय. नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी हॉटेल्सवर अन्न आणि औषध प्रशासनाने निलंबनाची कारवाई केलीय. एफडीएकडून मथुरा प्युअर व्हेज हॉटेलवर कारवाई केल्यानं शहरात चर्चा होत आहे. एफडीएच्या पथकानं अन्न पदार्थांचे नमुने जप्त केले आहेत. ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल येईपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
https://www.youtube.com/c/hindusthanpost
