Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tulsi : तुळशीच्या पानांतून 'वेलनेस'चा नवा मंत्र!

Tulsi : तुळशीच्या पानांतून 'वेलनेस'चा नवा मंत्र!

  • हिंदुस्थान पोस्ट ब्युरो

कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीपासून तुळशीविवाहाची लगबग सुरू होते. मंगलाष्टकांसोबत तुळशीविवाहाचा (Tulsi Vivah) मंगल सोहळा हिंदू घराघरांत साजरा केला जातो.

अंगणातली तुळस केवळ पूजेपुरती मर्यादित नाही; तर तिच्याभोवती गुंफलेली आपली संस्कृती, निसर्गाशी असलेलं नातं आणि आरोग्यविषय गुणधर्मांनाही विशेष महत्त्व आहे.

आज याच तुळशीने (Tulsi) आधुनिक 'वेलनेस'च्या जगातही आपलं स्थान निर्माण केलं आहे. तुळशीचा चहा, तुळशीचा काढा, तुळस-आलं-पुदिन्याची हर्बल पेये, तुळशीच्या पानांचा विविध आरोग्यदायी पेयांमध्ये वापर असा ट्रेंड वाढताना दिसतो. रासायनिक घटकांपेक्षा नैसर्गिक आणि पारंपरिक पर्यायांकडे वळण्याची इच्छा, संतुलित आहार, योग, व्यायाम आणि मानसिक आरोग्याविषयी वाढलेली जागरूकता यामुळे तुळस या वनस्पतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे.

तुळशीला आयुर्वेदात दीर्घकाळापासून महत्त्वाचं स्थान आहे. आधुनिक संशोधनातही 'ओसिमम टेन्युइफ्लोरम' असे तुळशीचे शास्त्रीय नाव आहे. म्हणजेच पवित्र तुळशीवर विविध प्रयोग आणि अभ्यास झाला आहे. पूर्वी तुळशीला (ओसिमम सँक्टम) या नावानेदेखील ओळखले जात असे. आयुर्वेदामध्ये सर्दी, खोकला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीाच्या पानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. राम तुळस, कृष्ण तुळस, कापूर तुळस, वन तुळस असे तुळशीचे अनेक प्रकार आहेत. तुळशीचे (Tulsi) आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्म लक्षात घेता आजचा 'वेलनेस' ट्रेंड अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

तुळशीमध्ये जीवनसत्त्व 'सी' आणि 'झिंक' मुबलक प्रमाणात असते. दररोज सकाळी तुळशीची २-३ पाने खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. तुळस ही एक उत्तम औषधी गुणधर्मांनी युक्त वनस्पती आहे. ती शरीरातील 'कॉर्टिसोल' नावाच्या 'स्ट्रेस हार्मोन'ची पातळी नियंत्रित ठेवते आणि मन शांत करण्यास मदत करते. ॲसिडिटी, गॅस आणि अपचन यांसारख्या पोटाच्या तक्रारींवर तुळशीचा रस किंवा पाने गुणकारी ठरतात. तुळशीच्या पानांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मुरूमं आणि त्वचेचे संसर्ग कमी होतात. तसेच दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी तुळशीची पाने चघळणे फायदेशीर ठरते. तुळशीविवाहाची परंपरा आपल्याला निसर्गाचा सन्मान करायला शिकवते, तर आजचा 'वेलनेस ट्रेंड' याच तुळशीकडे आरोग्याकडे नव्या दृष्टीनेही पाहायला शिकवतो.

तुळशीला भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात अत्यंत विशेष स्थान असून, ती केवळ एक औषधी वनस्पती नसून भक्ती, शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक मानली जाते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post