- ऋजुता लुकतुके
US Iran War : इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या पेट्रोकेमिकल उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कच्चा माल पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भारतीय कंपन्यांना उत्पादन कमी करावे लागत असून काही कारखाने तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे.
या परिस्थितीमुळे भारताचे आयात-आधारित पेट्रोकेमिकल मॉडेल पुन्हा चर्चेत आले आहे.
'लाइव्हमिंट'च्या वृत्तानुसार, एसआरएफ लिमिटेडसारख्या मोठ्या कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवण्यासाठी आवश्यक रसायनांचा तुटवडा जाणवत आहे. कंपन्यांना वाढत्या किमतीत पर्यायी बाजारातून कच्चा माल खरेदी करावा लागत असून त्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (US Iran War)
भारताचा रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योग (Petrochemical industry) मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियातील पुरवठ्यावर अवलंबून आहे. मेथेनॉल, इथिलीन ग्लायकॉल, नॅफ्था आणि बेंझीनसारख्या महत्त्वाच्या रसायनांचा मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे (Strait of Hormuz) भारतात येतो. इराण युद्धामुळे या मार्गावर परिणाम झाल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. (US Iran War)
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम पेट्रोकेमिकल उद्योगावर होत असून प्लास्टिक, पॅकेजिंग, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग आणि वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. परिणामी अनेक उत्पादन क्षेत्रांमध्ये महागाईचा दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (US Iran War)
या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Govt) काही महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्क तात्पुरते हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय जूनअखेरपर्यंत लागू राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (US Iran War)
तज्ज्ञांच्या मते, या युद्धाने भारताची ऊर्जा आणि रसायन क्षेत्रातील आयात अवलंबित्वाची मोठी कमकुवत बाजू उघड केली आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, पर्यायी पुरवठा साखळी निर्माण करणे आणि हरित रसायन तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. (US Iran War)
