ऋजुता लुकतुके
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
त्यातच इराणने अमेरिकेच्या ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविराम प्रस्तावाला नकार दिल्याने दोन्ही देशांमधील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. (US-Iran War)
इराणने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना तात्पुरता युद्धविराम मान्य नसून कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. त्यांच्या मते, केवळ काही दिवसांसाठी संघर्ष थांबवून समस्या सुटणार नाही. त्यामुळे त्यांनी अधिक व्यापक आणि दीर्घकालीन शांतता करारावर भर दिला आहे. या भूमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मग युद्धविराम शक्यच होणार नाही का? तो व्हायला असेल तर सगळ्यात चांगली शक्यता आहे ती मुस्लीम देशांच्या मध्यस्थीची. (US-Iran War)
सध्याच्या परिस्थितीत सर्वोत्तम शक्यता अशी मानली जाते की, पाकिस्तान, तुर्की किंवा इजिप्तसारखे देश मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना चर्चेच्या टेबलावर आणू शकतील. अशा वेळी तात्पुरता युद्धविराम लागू होऊ शकतो आणि त्यातून कायमस्वरूपी कराराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली झाल्यास जागतिक तेल बाजाराला मोठा दिलासा मिळू शकतो. (US-Iran War)
मात्र, सर्वात वाईट परिस्थितीत हा संघर्ष मोठ्या युद्धात परिवर्तित होऊ शकतो. अमेरिका इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करू शकते, तर इराणकडूनही तीव्र प्रतिहल्ले होण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील स्थैर्य धोक्यात येऊ शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
एकंदरीत, अमेरिका-इराण संघर्ष सध्या अत्यंत नाजूक टप्प्यावर असून पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. शांततेचा मार्ग निवडला जाईल की संघर्ष अधिक तीव्र होईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (US-Iran War)
