Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

वाहन चालकांसाठी 'व्यवहारिक मराठी'चे ज्ञान आता सक्तीचे; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची मोठी घोषणा

  • प्रतिनिधी

Pratap Sarnaik महाराष्ट्र राज्याच्या भूमीत राहून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीचा आणि भाषेचा मान राखावा, या भावनेतून राज्य सरकारने एक धडाकेबाज आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

यापुढे महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवू इच्छिणाऱ्या चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’चे ज्ञान अनिवार्य करण्यात आले असून, १६ ऑगस्ट २०२६ पासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात ही घोषणा करताच सभागृहात मोठी खळबळ उडाली. (Pratap Sarnaik)

​महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील विविध कलमांत दुरुस्ती करून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. "मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती इथल्या संस्कृतीचा श्वास आहे," असे प्रतिपादन करत मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय कोणाविरोधात नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ संवादासाठी घेतला आहे. अनेकदा चालक आणि प्रवासी यांच्यात भाषेच्या अडथळ्यामुळे गैरसमज होतात किंवा आपत्कालीन परिस्थितीत संवाद साधणे कठीण जाते; ही दरी या निर्णयामुळे मिटणार आहे. (Pratap Sarnaik)

​या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या सहकार्याने हजारो शिक्षकांची फळी उभी करण्यात आली आहे. चालकांना रोजच्या व्यवहारात लागणारी मराठी, प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा-ठिकाणे विचारणे आणि महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांशी आदराने बोलण्याचे खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी सोप्या पुस्तिका आणि विशेष अभ्यासक्रमही तयार करण्यात आले आहेत. (Pratap Sarnaik)

​"महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे, पण इथल्या संस्कृतीचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे," असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. १६ ऑगस्टपासून परवाना नूतनीकरण किंवा नवीन परवान्यासाठी या भाषिक चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या "लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी" या ओळींचा दाखला देत, हा निर्णय महाराष्ट्राच्या अस्मितेचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता या निर्णयामुळे वाहन क्षेत्रात भाषिक स्वाभिमानाचे वारे वाहू लागले असून, याचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pratap Sarnaik)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post