Dailyhunt

Veer Savarkar - बॅरी द्वंद्वयुद्ध

  • मंजिरी मराठे

माणिकतोळा प्रकरणात दहा वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले उल्हासकर दत्त सेल्युलर कारागृहात (Cellular Jail) कोलूला जुंपले गेले. दिवसभर ती अत्यंत अघोरी शिक्षा भोगत असता, कोलू ओढताना कोणी जरा जरी रेंगाळला तर शिव्यांबरोबर पाठीत सोटाही हाणला जात असे.

फटके खाऊनही कोणी वेगात कोलू चालवू शकला नाही तर घाण्याच्या दांड्याला त्याचे हातपाय बांधले जात. दांडा धरून इतर बंदीवानांना कोलू फिरवायला लावल्यावर बांधलेल्या बंदीवानांचं अंग रक्तबंबाळ होई, तोंड फुटे, डोकं आपटे. संध्याकाळी कोठडीत बंद झाल्यावर सकाळी उठायची ताकद रहात नसे. पण पुन्हा दिवस उगवे, तो तेच संकट घेऊन. उल्हासकर दत्त यांनी हे सारं अनुभवलं. त्यांना बाहेर कामावर ओल्या विटा वाहण्याचं काम देण्यात आलं. त्या अतिशय कष्टाच्या आणि कंटाळवाण्या कामासाठी लालूच म्हणून बंदीवानांना दूध दिलं जात असे. पण त्या दुधावर नजर असे ती तांडेल, पेटी ऑफिसरांची. पण उल्हासकर ते स्वत:च पीत असत. याचा राग येऊन त्यांना कड्यासारख्या टेकडीवरच्या बंगल्यात कावडीतून पाणी भरण्याचं काम देण्यात आलं. ते काम करणं असह्य झाल्यावर त्यांनी काम करण्यास नकार दिला. तुला तीस वेत मारले जातील असं सांगूनही, ते काम करेनात तेव्हा त्यांना आठ दिवस हातकडीत टांगण्यात आलं. त्या स्थितीत क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर एक देखावा तरळून गेला. ते सारं काही प्रत्यक्ष घडत आहे असंच त्यांना वाटत होतं.

तो देखावा असा – "बंदीपाल डेव्हिड बॅरी (David Barry) त्यांना म्हणत होता, "तू माझा उपमर्द केलास. चल, मी तुझ्याशी द्वंद्वयुद्ध खेळतो! तुझ्या वतीने कोण प्रतिनिधी असेल ते बोलाव. मला वाटते, तुझ्या वतीने तुझा पक्ष घेऊन सावरकर (Veer Savarkar) द्वंद्वयुद्ध करतील. असे बोलत त्याने सावरकरांना टेलिफोनने बोलावले, सावरकर नेहमी दिसत त्याहून थोडी कृश अशी एक व्यक्ती पुढे आली. बंदीपालाने त्यांना विचारले की, "उल्हासचा पक्ष घेऊन तुम्ही द्वंद्वयुद्ध खेळाल का?" ते म्हणाले, 'होय.' लगेच बंदीपाल बॅरीने, एक हातमोजा आव्हान देण्यासाठी फेकला आणि एक हत्यार सावरकरांस दिले. या वेळेस मी माझ्या प्रतिनिधीच्या आणि बॅरीच्या त्या द्वंद्वयुद्धाकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत राहिलो आणि जेव्हा बॅरीचे आणि सावरकरांचे ते सशस्त्र द्वंद्वयुद्ध चालता चालता आमच्या पक्षाचा विजय होऊन बॅरीच्या तोंडावर सावरकरांनी फेकलेला तो हातमोजा फाडकन बसताच बॅरीचे तोंड झणझणत उतरून गेले. तेव्हा मला विलक्षण आनंद झाला…"- तेवढ्यात उल्हासकर दत्त सावध झाले. तो देखावा वितळून नाहीसा झाला. त्यांना हातकडीत टांगलेलं असतानाच त्यांना ताप भरू लागला. ही बातमी दोनदा कार्यालयात पोहोचवण्यात येऊनही त्यांना हातकडीतून सोडवण्यात आलं नाही. त्यांना १०७ ताप भरला, त्यांची शुद्ध हरपली, त्यांना भयंकर आकड्या येऊ लागल्या. तापात ते रात्रभर कर्कश किंचाळत होते. त्यांना दुसऱ्या दिवशी वीजेचे झटके देण्यात आले. त्या किंकाळ्या ऐकल्यावर कोणातरी बंद्यास 'ठीक करण्यात' येत असेल असं वाटून सारेच बंदीवान अस्वस्थ झाले. सावरकरांनी पहारेकऱ्याला विचारलं की, "कोण किंकाळ्या फोडीत आहे. काय गडबड आहे?" अर्थातच त्यानं आपल्याला काही माहीत नसल्याचं सांगितलं. त्या अंतःकरण भेदून जाणाऱ्या करुण, पण पिसाळलेल्या किंकाळ्यांनी सारं कारागृह भरून गेलं. कोणाला तरी ओढीत, पाडीत रुग्णालयात नेत होते. इतक्यात एका पहारेकऱ्यानं धावत येऊन हळूच सावरकरांना सांगितलं की, 'उल्हासकर, पागल हो गया!' आपली फाशीची शिक्षा ऐकतानाही हसणारा निर्भीड, विनोदी स्वभावाचा उल्हासकर वेडा व्हावा असे कष्ट त्याला दिले गेले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार होतील असं वाटत असताना रुग्णालयातूनही त्यांचं कर्कश क्रंदन साऱ्यांना ऐकू येऊ लागलं. त्यांना विजेचे झटके देण्यात येत होते. त्यानंतर दोनचार दिवसांनी बॅरी सावरकरांशी बोलायला आला आणि हसत हसत सावरकरांना म्हणाला, "काय तुम्हाला कधी वेड लागणार?" सावरकर रागानेच म्हणाले, "क्वचित तुम्हाला वेड लागल्यानंतर!" बॅरीने उल्हासकर दत्त यांच्या वेडाची गोष्ट काढताच सावरकर (Veer Savarkar) त्याला म्हणाले, "इंदुभूषणाने फाशी खाल्ली तेव्हा तुम्ही म्हणालात त्याने ती कष्टांस कंटाळून खाल्ली नाही, तर वेड लागून खाल्ली. तेव्हा मी आपणास म्हटले, पण वेड का लागले, हा प्रश्न उरतोच. आता हे उल्हासला वेड लागले, त्याचे कारण तरी त्याला झालेले कष्ट आणि राजबंदीवानांना भविष्यकालीही आशा ठेवलेली नाही, या वस्तुस्थितीवाचून इतर दुसरे कोणतेही नाही ना? तेव्हा कष्टाने वेड लागते आणि वेडात मनुष्य फाशी खाऊ पाहतो ते उल्हासच्या उदाहरणावरून सिद्ध झालेले असून राजबंदीवानांच्या आयुष्याचा नाश आत्मवधाच्या गळफासात किंवा भ्रमाच्या रुग्णालयात करण्याचे उत्तरदायित्व मुख्यत्वेकरून ज्या पद्धतीने त्यांना वागविण्यात येत आहे त्या पद्धतीचे कठोरपणावरच आहे हे माझे विधान खरे ठरत आहे." हे ऐकल्यावर बॅरी चवताळून म्हणाला, "पण उल्हासला वेड लागले हे तुम्हास कशावरून कळले? तो वेडाचे ढोंग करीत आहे!" सावरकर (Veer Savarkar) म्हणाले की, "मला किंवा आमच्यातील आणखी कोणास त्यास जाऊन भेटू द्या म्हणजे खरे खोटे आम्हांस कळेल". बॅरी जास्तच चिडला आणि म्हणाला, "छट्, आम्ही खोटे बोलतो की काय? उल्हासला वेड लागलेले नसून तो काम चुकविण्यासाठी इतर पाजी बंदीवानांप्रमाणेच केवळ वेडाचे ढोंग करीत आहे!" सावरकर उत्तरले की, "जर त्यास वेड लागलेले नसेल तर तुम्हांस तरी वेड लागलेले आहे हे निश्चित. तुम्ही आणि तुमचे वरचे अधिकारी आम्हांस राजबंदीवानांच्याप्रमाणे स्वतंत्र वर्ग समजून सवलतीने वागवा, नाहीतर निदान साधारण बंदीवानांप्रमाणे तरी वागवा, पण हा सध्याचा विलक्षण त्रास संपवा. नाहीतर संपाविना आम्हांस दुसरा मार्ग मोकळा राहणार नाही. संपाने आम्ही तुमच्या शक्तीशी टक्कर देऊ शकू असे नाही. पण शक्यतोवर अन्यायाचा आणि अपमानाचा प्रतिवाद आणि प्रतिकार केल्याचे समाधान तरी आमच्या मनास लाभेल." नेहमीप्रमाणे बॅरी तणतणत निघून गेला. एका सहृदय पर्यवेक्षकानं त्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती होण्यास सुचवलं. उल्हासकर दत्त यांनी तो पर्याय निवडला. सुरुवातीला अंदमानातील आणि नंतर मद्रासमधील वेड्यांच्या रुग्णालयात दहा बारा वर्षे काढून अत्यंत कष्टप्रद अशा त्यांच्या वनवासाची अखेर झाली.

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post