यथार्थ दामले
अनादी, अनंत सावरकर
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववुं मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकतें
हलाSहलS । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।
(आत्मबल – स्वातंत्र्यवीर सावरकर)
Veer Savarkar Jayanti 2026 ज्याप्रमाणे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे 'माउली'पण समजण्यासाठी 'पसायदान'च पुरेसे ठरते, त्याच न्यायाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हृद्गत जाणून घ्यायचे असल्यास त्यांची 'आत्मबल' कविताच पुरेशी आहे असे मला वाटते. जसजसं या कवितेचं सतत वाचन होत गेलं तसतसं सूर्याच्या जवळ जाताना त्याचा परीघ मोठा होत जावा तसतसा या कवितेचा आशय अधिक व्यापक, अधिक खोल जाणवत राहिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे व्रत स्वीकारलं होतं ते 'देशभक्तीचं' व्रत होतं आणि स्वीकारलेल्या देशभक्तीच्या व्रताचा 'मृत्यू' हा अगदी अपेक्षित असा परिणाम स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही मान्य आहे. पण तो मृत्यू शत्रूशी दोन हात करताना, त्याला निकराचा लढा देताना आलेला मृत्यू अपेक्षित आहे. यातील ग्यानबाची मेख अशी की जोपर्यंत मृत्यूचं भय एखाद्या वीराच्या मनात आहे तोपर्यंत तो पूर्णत्वाने निकराचा लढा देऊ शकत नाही. (Veer Savarkar Jayanti 2026)
आत्मस्वरूपाची जाणीव आणि निर्भयता
क्षेत्र कुठलेही असो, कार्य कुठलेही असो 'निर्भयता' हा सर्वात मूलभूत असा गुण आहे. "अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः " याप्रमाणे 'भगवद्गीतेत' भगवान श्रीकृष्ण 'दैवी संपत्तीच्या' पुरुषाच्या गुणांचे वर्णन करताना 'निर्भयता' हाच त्याचा पहिला गुण सांगतात. आणि 'भय' हे नेहमी 'अज्ञानातून' उत्पन्न होत असते. 'मृत्यू' जो आहे तो शरीराला आहे आणि शरीर म्हणजे आपण अशी मनुष्याची समज असल्यामुळे मृत्यूबरोबर शरीर नष्ट होणार असल्यामुळे मृत्यूची मानवाला सतत भीती वाटत असते. शरीराच्याही पलीकडे एक 'आत्मा' नावाचे तत्त्व आपल्या संस्कृतीत सांगितले आहे. हेच खरे आपले मूळस्वरूप आणि जे मुळात जन्म-मृत्यूच्या पलीकडे आहे. 'आत्मा' जन्माला आला नाही त्यामुळे त्याला मृत्यूही नाही. ही गोष्ट एकदा पूर्णतः कळली की मग भय कसले. या आत्म्याच्या अमरत्वाची जाणीव पूर्णपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांना होती. याच जाणीवेचे प्रकटीकरण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मबल या कवितेत सुरुवातीलाच म्हणतात, "अनादी मी अनंत मी अवध्य मी भला| मारील रिपु जगती असा कवण जन्मला||'' नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः|| या गीता वचनाचा आधार घेऊन सावरकर पुढे म्हणत आहेत की, "अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो.'' अशा त्या आत्म्याला आता मृत्यू कुठला. उलट तो मृत्यूच एखाद्या भ्याड माणसासारखा मला बघून पळत सुटतो. (भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो). पण हे आता त्या मूर्ख शत्रूला कुठून कळणार. त्या शत्रूला मृत्यू हीच काय ती जगातली सर्वात भयानक गोष्ट आहे असे वाटते आणि म्हणूनच मृत्यूची भीती दाखवत मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासाठी ते मला काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठवत आहेत. (खुळा रिपू। तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये) (Veer Savarkar Jayanti 2026)
प्रत्याक्रमण आणि धीरता
कवितेच्या या दुसऱ्या कडव्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असे अत्यंत मूलभूत दोन गुण स्वातंत्र्यवीर सावरकर अधोरेखित करत आहेत. त्यातला पहिला गुण म्हणजे 'धीरवृत्ती' आणि दुसरा गुण म्हणजे 'प्रत्याक्रमण'. धीर वृत्ती धारण करून येऊ घातलेल्या संकटांचा सामना करताना ते म्हणतात की, "देशसेवेचे व्रत हाती घेतलं म्हणून मला सिंहाच्या तोंडी द्याल तरी हरकत नाही. तो सिंहच एखाद्या नम्रदासाप्रमाणे माझे पाय चाटेल. या देशसेवेची किंमत म्हणून तुम्ही मला अग्निप्रवेश करायला लावला तरी हरकत नाही. पण माझ्या या धीरवृत्तीपुढे अग्नी ज्वालासुद्धा शितल पाण्याचा स्त्रोत होईल. 'अटॅक इस द बेस्ट डिफेन्स' (प्रत्याक्रमण हाच संरक्षण करण्याचा सर्वोत्तम उपाय असतो हेच सूत्र घेऊन सावरकर इथे शत्रुला म्हणत आहेत की, तुमच्या सुसज्ज सैन्यापेक्षा अधिक सुसज्ज सैन्य आणून, तुमच्या शस्त्रांपेक्षा अधिक अत्याधुनिक शस्त्र आणून मी तुम्हाला प्रत्युत्तर देईन. इथे स्वातंत्र्यवीर सावरकर "मी तुम्हासी तैसाचि गिळूनी जिरवितो" असं म्हणत आहेत. 'एखादा पदार्थ खाऊन जिरवणे अथवा पचवणे हे पचनशक्ती चांगली असल्याचं लक्षण असतं. आवडीचा पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त सेवन करायचा असला तरी तो पचवता आला पाहिजे. नाहीतर नंतर त्या अती सेवनामुळे जर तब्येत बिघडली तर त्या पदार्थाचा घेतलेला आनंदही टिकत नाही. (Veer Savarkar Jayanti 2026)
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला आहे त्याचे सार काढायचे झाल्यास, "आत्मस्वरूपाची जाणीव ठेवून निधड्या छातीने समोर येईल त्या स्वरूपात-मग ते आवडीचे असो वा नावडीचे असो, मोहक असो वा भीषण असो-परंतु कर्तव्य करत राहण्यातच श्रेष्ठता आहे" हेच होईल. तेच सार 'आत्मबल' या कवितेतून वीर सावरकरांनी मांडले आहे. ही कविता म्हणजे 'स्फूर्तीचा महामंत्रही' आहे, शत्रूला नामोहरम करणारा 'वज्राघातही' आहे आणि संकटाच्या आघातापासून संरक्षण करणारे 'कवचकुंडलही' आहे. काळाच्या कसोटीवर टिकणारा गीतेचा हा 'कानमंत्र' आपल्या आचरणातून जगापुढे मांडणाऱ्या सावरकरांविषयी कोणी विचारले की, सावरकर कसे आहेत तर इतकंच म्हणावसं वाटतं की सावरकर हे 'अनादी', 'अनंत' आहेत. (Veer Savarkar Jayanti 2026)
|| भारतमाता की जय ||
|| हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर की जय ||
