Veer Savarkar Jayanti 2026 ज्येष्ठ लेखक श्री. पु. गोखले म्हणतात, तात्यारावांची बुद्धी सामाजिक नि राजकीय विचारांत चौफेर वावरणारी. त्यांचे विचारही ज्वलंत, स्फोटक, खळबळजनक, तेजस्वी द्रष्टेपणाचे!
स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट होणे अत्यंत दुर्मिळ. 'सावरकरांशी सुखसंवाद' या ग्रंथात त्यांनी लिहिले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दोन तपांपेक्षा अधिक सहवास लाभला. अनेक वेळा त्यांना त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचाही योग आला. आपल्या प्रदीर्घ सहवासात श्रीपुंनी सावरकरांशी अनेक विषयावर चर्चा केली, वाद घातला, अनेक खोचक नि वेडेवाकडे प्रश्न विचारले. सावरकरांनीही तितक्याच मोकळेपणाने उत्तरे दिली. अशा वेळी झालेल्या संभाषणातून वीर सावरकर यांनी व्यक्त केलेले विचार, अविस्मरणीय आठवणी आणि त्यांच्या दैनंदिन सवयी याविषयी माहिती देणारा लेख… (Veer Savarkar Jayanti 2026)
ज्वालामुखीच्या अंतरंगात या मनोगतात श्री. पु. म्हणतात, ३१ डिसेंबर १९३७ रोजी कर्णावतीला मी दडपून त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिलो. तेव्हापासून ते जवळजवळ त्यांच्या आत्मार्पणापर्यंत दोन तपांपेक्षा अधिक काळ मला त्यांचा अनेक प्रसंगी सहवास केवळ योगायोगाने लाभला. याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. सावरकरांची भेट होणे, ही अशक्य कोटीतील गोष्ट असे, परंतु माझे सुदैव असे की, मला केव्हाही भेटीअभावी त्यांच्या घरून परतावे लागले नाही. मला अनेक वेळा त्यांच्याबरोबर प्रवासालाही जावयास मिळाले. पूर्वसंकेताने भेटीगाठी व्हाव्या असे त्यांचे स्पष्ट मत होते. भेटीत पुष्कळ वेळा तेच बोलत असले तरी त्यांना थट्टा विनोद आवडत असे, पण फुकटफाकट चकाट्या पिटत बसणे मात्र त्यांना मुळीच पसंत नसे. तल्लख व माहितगार माणसांच्या भेटीत ते विशेष रंगून जात. त्यांना कसाही वेडावाकडा, खोचक प्रश्न केला तरी ते चिडलेले मला कधीही आढळले नाहीत. त्यांची विचारसाखळी आणि वक्तृत्व रंगले म्हणजे ते मंत्रमुग्ध होऊन ऐकत बसावेसे वाटे. (Veer Savarkar Jayanti 2026)
तात्यांचा ऐन तारुण्याचा काळ अंदमानच्या रूक्ष वातावरणात गेला. त्यानंतर ते रत्नागिरीसारख्या दुर्लक्षित जिल्ह्यात एक तपाहून अधिक काळ राहिले. सावरकरांना या स्थानबद्धतेच्या काळात त्या वेळचे इंग्रज सरकार फक्त मासिक साठ रुपये देत असे. ते किर्लोस्कर मासिकात नियमित लिहू लागले त्या वेळी या उत्पन्नात आणखी तीस रुपयांची भर पडली. तोपर्यंत या बॅरिस्टरचा वर्षभराचा संसार सरासरी एक हजार रुपयात चालत होता. या तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांची राहणी साहजिकच मध्यम वर्गातील गरीब माणसासारखीच असणे क्रमप्राप्त होते. मुंबईत स्थायिक झाल्यावर या राहणीत थोडाफार फरक पडला असला तरी त्यांची राहणी साधीच होती. (Veer Savarkar Jayanti 2026)
तात्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय नव्हती, फारशी आवडही नव्हती असे म्हटले तरी चालेल. हिंदुमहासभेचे अध्यक्ष असताना सर्व महत्त्वाचा पत्रव्यवहार, प्रकट निवेदने इत्यादी कामे ते रात्रीच्या वेळीच करत असत. सकाळी चहापानानंतर रोजची वर्तमानपत्रे वाचणे हा त्यांचा महत्त्वाचा कार्यक्रम असे. वर्तमानपत्रांतील महत्त्वाच्या मजकुरावर खुणा करून ठेवणे असा कार्यक्रम चालत असे. हे वाचन, कात्रण होईपर्यंत सकाळचे ९-९.३० होत. त्यानंतर कार्यवाहांपैकी कोणी आलेले असेल त्यांना ते त्यांची इतर कामे सांगत असत. स्नानापूर्वी अंगाला खोबरेल तेल लावीत असत. प्रकृती चांगली असे, तोपर्यंत गार पाण्याचे स्नान हा त्यांचा एक आवडता छंद होता. तात्यांना आंघोळीसाठी भरपूर पाणी लागत असे. स्नानगृहाचे दार बंद झाले म्हणजे त्यांच्या गायनकलेला बहर येत असे. अर्थात हे गायन गुणगुण्याची मर्यादा सहसा ओलांडून जात नसे! डोक्यावरून पाणी घेताना ते तांब्या वापरीत नसत. हौदातून बादली भरून घ्यायची आणि ती आपल्या डोक्यावरून ओतून रिकामी करायची असा क्रम बराच वेळ चाले. स्वत:च्या तुकतुकीत केशरहित व पिवळसर मस्तकावर बरेच पाणी घेतल्यानंतर त्यांचे समाधान होई. कायम वैचारिक रसायने धगधगणाऱ्या त्या मस्तकाला शांत करावयाचा हा मार्ग त्यांनी शोधून काढलेला असावा असेच माझ्या नेहमी मनात येई! त्यानंतर सौ. माईंनी निऱ्या करून ठेवलेले पांढरे शुभ्र धोतर नेसत नेसतच ते स्नानगृहाबाहेर पडत. तात्यांची धोतर नेसावयाची पद्धत नि लकब मोठी मजेदार होती. धोतराचा पायघोळ सोगा सोडल्यानंतर तो पायात येऊ नये म्हणून उजवा पाय एका विशिष्ट पद्धतीने वेळावत वेळावत चालावयाची त्यांची ढब मोठी आकर्षक वाटत असे. यानंतर ते स्वत:च्या खोलीत येत. खोलीत टेबलाजवळच असलेल्या खुर्चीवर पद्मासन घालून बसत. आसन घातल्यानंतर डोळे मिटून ते ध्यानस्थ बसत. हा स्मरणाचा, ध्यानाचा, मन:शांतीचा पाठ दररोज पंधरा मिनिटांपासून ते जास्तीत जास्त अर्ध्या तासापर्यंत चालत असे. (Veer Savarkar Jayanti 2026)
त्यांना शेव, भजी व दही, लिंबाचे लोणचे व साधारण तिखट पदार्थ आवडत. रत्नागिरीचा हापूस आणि आईस्क्रिम हे सर्वात जास्त आवडीचे पदार्थ होत, असे म्हणता येईल. मासाही आवडीचाच. संध्याकाळी घराच्या गच्चीवर येरझाऱ्या घालीत असत. फुलझाडांची आवड असल्याने ते कधी कधी स्वत:च्याच लहानशा बागेतील फुलझाडांत रमून जात त्यावेळी तोंडाने बारीक शिळ घालतानाही मी त्यांना पाहिले आहे. गुलाब आणि चाफा ही फुले त्यांची आवडती. सांगण्यासारखी सर्वात गमतीची गोष्ट अशी की, लाखालाखांच्या जनसंमर्दाला आपल्या वक्तृत्वाने मोहून टाकणारे सावरकर संकोची आणि बुजरे होते. सायंकाळचा फिरण्याचा व्यायाम चालू असताना त्यांना कोणी पाहिले तर ते चटकन आडोशाला जात असत. दिवसभर सुपारीची खंडे आणि लवंगा ते चघळीत असत. रात्रीची झोप नैसर्गिक रितीने येत नसल्याने ते डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे 'ब्रोमाईड'सारखे झोपेचे औषध घेत. काळी गोल टोपी, कधी धोतर तर कधी पँट, त्यावर कोट, कोटाच्या आतल्या खिशात एखादे शस्त्र व अत्तराची बाटली, कोटातील वरच्या खिशातून बाहेर डोकावणारा रुमाल, एका हातात छत्री व दुसऱ्या हातात घड्या केलेले वर्तमानपत्र, पायात पठाणी वहाणा किंवा पट्ट्याचा बूट या वेशातली सावरकरांची सार्वजनिक प्रसंगी दिसणारी ठेंगणी मूर्ती सर्वांच्याच परिचयाची आहे. (Veer Savarkar Jayanti 2026)
राष्ट्रकार्याची तळमळ
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद सर्वांनाच झालेला होता. तात्याही आनंदात असले, तरी चिंतामग्न होते. भारताचे खंडन त्यांना अस्वस्थ करीत होते. विभाजनाच्या दु:खाबरोबर त्यांना निर्वासितांचे लोंढे, हिंदूंची हानी या गोष्टींमुळे काहीसे उदासीनही केले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना आपल्याकडून राष्ट्रकार्यासाठी हवी ती सेवा करावयाची तार पाठवून आपल्या राष्ट्रकर्तव्याची राष्ट्राला जाणीव करून दिली होती. त्यांनी ही तार पाठविली, ती वर्तमानपत्रात प्रसिद्धही झाली. मी त्यांना अशी तार पाठविण्याचा उद्देश विचारला होता. त्यावर ते म्हणाले होते, "मी काही वर्तमानपत्री प्रचारासाठी ही तार केलेली नाही. माझे उरलेले आयुष्य राष्ट्रकार्यासाठी देण्याला मी खरोखरच उत्सुक आहे." "तुमच्या या तारेला उत्तर तरी येईल का? तुमची तळमळ त्यांच्या ध्यानात तरी येईल का?" मी विचारले. "तारेला उत्तर येईल, नाही तर येणार नाही! मला त्याची पर्वा नाही. प्रत्येकाने राष्ट्रकार्यासाठी यापुढे आपल्या शक्तीचा व्यय केला पाहिजे या भूमिकेतून मी सिद्ध असल्याचे कळविले आहे. इतकेच काय ते!" "यावेळी एकपक्षीय सरकार असावे की सर्वपक्षीय" "प्रारंभी मुख्यत: देशहित डोळ्यांपुढे पाहिजे. देशहितापुढे पक्ष गौण आहेत. सर्वांचे सहकार्य घ्यावे. मुख्य धोरणे आखावी. देश संपन्न नि सशक्त करावयाचे काम हाती घ्यावे. त्यासाठी देशातील व परदेशातील तज्ज्ञ बोलवावे. त्यांची मते घ्यावी आणि भारतीय हिताचे नि आपल्या राष्ट्रीय प्रकृतीला झेपेल तेच कार्यक्रम हाती घ्यावे." (Veer Savarkar Jayanti 2026)
रसिकमन…
तात्यांची राहण्याची पद्धत अगदी साधी होती. त्यांना कशाचेही व्यसन होते, असे म्हणता येणार नाही, पण जगातल्या अनेक चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेणारे कवीचे मन त्यांच्याजवळ होते, त्यात काहीच शंका नाही. त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे अनेक वस्तूंचा आस्वाद घेतलेला असल्याचे ते स्पष्टपणे सांगत असत. त्यांना चहा मात्र हवाहवासा वाटे. सकाळी, दुपारी, व्याख्यानानंतर थकवा घालवण्यासाठी ते चहाचा आस्वाद घेत असत. त्याचप्रमाणे तपकीर ओढण्याचे त्यांना थोडेफार व्यसन होते, असे फार तर म्हणता येईल. तपकिरीला ते 'नस्य' असे म्हणत. याविषयी सांगताना ते म्हणत, "मला तपकिरीचे व्यसन कसे लागले याचा एक इतिहासच आहे. हे व्यसन एरवी घाणेरडे असले, तरी मला मात्र ते उपकारकच ठरले आहे. मला फार पूर्वीपासून थंडी-पडशाचा त्रास होतो. नाक बंद होऊन श्वासोच्छवासाला त्रास होतो. अंदमानात असताना तेथल्या हवेमुळे होणाऱ्या थंडी-पडशावरच काय, पण मोठमोठ्या रोगांवरही औषधोपचार होत नसत. पडशाने माझे नाक चोंदले म्हणजे श्वास घेता न आल्याने गुदमरल्यासारखे होई. हा त्रास मला वारंवार सुरू झाल्यामुळे मी माझ्या कोठडीतील भिंतीचा चुना खरवडून काढून, तो हातातल्या हातात चांगला चुरून तपकिरीसारखा ओढत असे. चुना म्हणजे काही नस्य नव्हे. चुना नाकात गेला की, शिंकांची फैर सुरू होई आणि शेवटी चोंदलेले नाक मोकळे होत असे. तेव्हा तपकीर मिळण्याची सोयच नव्हती. अशा वेळी मी ही युक्ती योजित असे. वारंवार पडसे होई आणि त्यामुळे कंटाळून माझा मीच जो उपाय काढला त्याची नांदी ही अशी झालेली आहे." (Veer Savarkar Jayanti 2026)
आत्मार्पण आणि आत्महत्या
'आत्मार्पण आणि आत्महत्या' या वीर सावरकरांच्या लेखातील सुरुवातीचा श्लोक होता – "धन्योSहम् | धन्योSहम्…कर्तव्यं मे न विद्यते किंचित् | धन्योSहम् | धन्योSहम् प्राप्तव्यं सर्वमद्य संपन्नम् ||" त्यांनी हिंदूराष्ट्राला दिलेल्या अनेक सूचनांनी, त्यांनी केलेल्या राजकीय चळवळींनी त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले होते. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळविणे हेच एकमेव ध्येय नि आपले कर्तव्य सावरकरांनी ठरविले होते. त्याचबरोबर सिंधूवाचून हिंदू पूर्ण होत नाही, असे म्हणून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आपल्या डोळ्यांसमोर ठेवण्याचे तरुणांना आवाहनही केले. स्वतंत्र भारताचे आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त व अद्ययावत असे एक कोटी सैन्य उभे करावे अशी सूचनाही केली होती. त्या वेळच्या नेहरू सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. विकासाच्या पंचवार्षिक योजनांबरोबर आपल्या सरकारने अणुध्वमपेक्षाही एखादे अधिक संहारक नि भयानक अस्त्र शोधावे, तयार करावे असे त्यांना वाटत होते. पण भारत सरकारने त्याही सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. सरकारला नव्हे तर तसे सरकार निवडणाऱ्या जनतेलाही ते दोष देतच होते. थोडक्यात लोकशाही संकेतानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या परीने इशारा देण्याचे आपले कर्तव्य करीतच होते. (Veer Savarkar Jayanti 2026)
करारी निश्चयी स्वभाव!
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शेवटच्या आजारात त्यांची ती कृश, फिकट, क्षीण परंतु करारी मूर्ती पाहताना मला माझ्या त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची, परंतु अगदी विरुद्ध टोकाच्या परिस्थितीची आठवण झाली. त्यांच्या त्या कृश आणि थकलेल्या चेहऱ्यावरही तोच करारीपणा मला दिसला होता. त्यांची त्या वेळची कृतीही त्यांनी सर्व आयुष्यभर केलेल्या करारी आणि निश्चीय स्वभावाला अनुसरून होती. त्यांनी सुमारे पंधरा दिवस फक्त चहावर काढल्यानंतर चहाही पिण्याचे नंतर सोडून दिले होते. फक्त घोटभर पाणी घेऊन त्यांची कालक्रमणा चालू होती. औषध घ्यावयाचेच नाही, हे त्यांनी पक्के ठरवून टाकले होते. सावरकरांनी औषध घेतले आणि डॉक्टरांना सहकार्य दिले तर ते सुधारतील अशी ग्वाही निष्णात आणि नामवंत डॉक्टर देत असतानासुद्धा त्यांनी पाण्यावाचून काही म्हणता काही घ्यावयाचे नाही, असा निश्चय केलेला होता. (Veer Savarkar Jayanti 2026)
हा माझाच आवाज काय रे?
प्रत्येक गोष्टीत शास्त्रीय दृष्टी असावी असे ते म्हणत, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना शास्त्रीय प्रगतीच्या वस्तू फारशा कधीच पाहावयास मिळत नसत. सावरकरांच्या तोंडचे वक्तृत्व त्यांना ऐकावयास मिळाले असेल, ते भाग्यवानच समजले पाहिजेत. आमच्या पिढीने जे विविध प्रकारचे आणि विद्वत्तापूर्ण वक्तृत्वाचे नमुने ऐकले ते आता लुप्तच झाले आहेत. अभिनव भारत सांगता समारंभाच्या वेळी सावरकरांच्या वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना पुण्यात ऐकावयास मिळाला. सिंधुवाचून हिंदू अशक्य अशा अर्थाचे जे सिंधुस्तोत्र त्यांनी त्या प्रसंगी गायिले ते त्यातील भावनेचा, अखंड भारताच्या आग्रहाचा, विद्वत्तेचा आणि वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून चिरंतन स्मरणात राहिल. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागणारे तात्या रागलोभाची कधीच पर्वा करत नसत. (Veer Savarkar Jayanti 2026)
एकदा ते मनमोकळे हसून मला म्हणाले, "श्री. पु., तू मला कधी घरी बोलावल्याचे आठवतेय का तुला?" ते विनोद करीत पण अशा प्रकारचे वाक्य त्यांच्या तोंडून कधी ऐकले नव्हते. या चेष्टेचे साहजिकच मला आश्चर्य वाटले. मी ही संधी साधून त्यांना माझ्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. ते घरी आल्यावर त्यांना त्यांचे भाषण ऐकवावे असे ठरवले. सावरकरांना त्या दिवशी इतर कार्यक्रम होतेच. ते संपल्यावर त्यांना मी घरी घेऊन आलो. माझे मित्र सुधीर फडके टेपरेकॉर्डरसह सज्ज होते. तात्या मोटारीतून खाली उतरणार तो आमच्या म्हणजे सार्वजनिक काका चौकात तीनचारशे माणसे जमलेली होती. ते वर येऊन स्थानापन्न झाले तो त्यांना सुधीर फडके, तो टेपरेकॉर्डर, माझ्या घरचा रेफ्रिजरेटर दिसला. तो पाहताच ते म्हणाले, "ही शीतपेटी का? आणि हा सुधीर काय करतोय इथे?" सुधीर फडक्यांनी काही उत्तर न देता टेपरेकॉर्डर चालू केला. त्याबरोबर त्यातून सावरकरांचा तो चिरपरिचित आवाज कानी आला! तो आवाज कानी पडताच मला ते म्हणाले, "हा माझा आवाज का रे? वा…भाषण चांगलं, अगदी मी बोलतोय असंच वाटतंय. माझं भाषण मी पूर्वी कधीच ऐकलेलं नव्हतं." इतके बोलून मला चूप अशी बोटाने खूण करून आपले भाषण ते तल्लीनतेने ऐकू लागले. (Veer Savarkar Jayanti 2026)
(श्री. पु. गोखले यांच्या 'सावरकरांशी सुखसंवाद' या पुस्तकातून)
(संकलन : नमिता वारणकर)
