Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Veer Savarkar Jayanti 2026 : तात्यांच्या स्पर्शानं उजळलेली रत्ने

  • विद्याधर नारगोलकर

Veer Savarkar Jayanti 2026 मित्रांनो, स्वातंत्र्यवीर स्वतः उत्तम पेटी वाजवायचे. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात असताना १९०२ मध्ये 'त्राटिका' या नाटकात छोटीशी भूमिका केली होती, तसेच १९०४ मध्ये 'ऑथेल्लो' या इंग्रजी नाटकाचे मराठी रूपांतरित असलेल्या 'झुंजारराव' या नाटकात 'इयागो'ची भूमिका केली होती.

तात्या रत्नागिरीत असताना अस्पृश्योद्धाराची चळवळ प्रथमतः सुरू केली. भंग्याच्या एका मुलाला विठ्ठलाच्या मंदिराच्या सभामंडपात उभे राहून ईश प्रार्थना म्हणावयास लावली. ती त्यांनी त्याच्याकडून चालीसहित पाठ करून घेतली होती. दही काल्याच्या दिवशी भयंकर गर्दी विठ्ठल मंदिरासमोर होत असे. एका विस्तीर्ण वृक्षाखालील पारावर उभे राहून तात्या स्वतः मोठ्या आवाजात 'तुम्ही आम्ही सकल हिंदू' हे गाणे हातवारे करून अभिनयासहित म्हणत असत. त्यांच्या कपाळावर त्यावेळी गुलाल फासलेला असे. जमलेले लोक त्यांच्या गाण्याची पुनरावृत्ती करीत. सारे वातावरण दुमदुमून जात असे. (Veer Savarkar Jayanti 2026)

सावरकरांनी अनेक कलावंतांच्या लेखकांच्या जीवनाचे सोने केले. त्यापैकी पहिला मान आबा दरेकर ऊर्फ कवी गोविंद यांना जातो. नाशिक येथील धोंडोपंत विश्वामित्र या भिक्षुकाच्या घरी अनेक महिला घरकाम करीत असत. त्यांच्यापैकी एका महिलेचा मुलगा अाबा दरेकर. दुर्दैवाने वयाच्या आठव्या वर्षी तापामुळे तो पांगळा झाला होता. पण 'लावण्या' नाटके लिहिण्याची त्याची शैली चांगली होती. विनायकाच्या 'सिंहगडाच्या पोवाड्याने' व त्यांच्या ज्ञान व शब्द भांडार यामुळे आबा सावरकरांकडे आकृष्ट झाला. त्याने तात्यांना स्वतःच्या लेखनासाठी साहाय्य करण्याची विनंती केली. तात्यांनी ती मान्य केली. तात्या या परीसाचा स्पर्श होताच आबाची गणना महाराष्ट्रातील उज्ज्वल देशभक्त आणि स्वातंत्र्यशाहीर यामध्ये होऊ लागली. ते कवी गोविंद या नावाने प्रसिद्ध झाले. यांची सर्वात गाजलेली कविता म्हणजे 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले!' मनोरमा देशपांडे या क्रांतिकारक राजगुरू यांच्या भाची होत्या. त्या, लता मंगेशकर व वि. ना. कोठीवाले असे तिघेजण मास्टर दीनानाथ स्मृती या ग्रंथाच्या कामासाठी तात्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी तात्या मनोरमा ताईंना म्हणाले, "तुम्ही क्रांतिकारक मामांचे जीवन चरित्र का लिहीत नाही? तुम्ही राजगुरूंचे चरित्र लिहून पूर्ण करा मी ते स्वतः प्रसिद्ध करीन." असे तात्या त्यांच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन देत होते. (Veer Savarkar Jayanti 2026)

२२ डिसेंबर १९३५ या दिवशी सावरकरांना पाठवलेल्या पत्रात विख्यात नाट्य समीक्षक के. क्षीरसागर म्हणतात, "लोकशिक्षण मासिकासाठी गेल्या वर्षांतील नाटकांवर लिहिण्याचे काम माझ्यावर आले. त्यामुळे आपले 'उत्तरक्रिया' नाटक माझ्या हाती आले. १९३३च्या मे महिन्यात मी आपले संन्यस्त खड्ग नाटक पाहिले होते. त्यातील बुद्धीप्रधान विनोद पाहून आपल्या सामर्थ्याविषयी आदर वाटला. शं. वा. कि. (शंकर वासुदेव किर्लोस्कर) तात्यांच्या लेखांनी सावरकरमय झाले. ते सांगत असत वीर सावरकरांच्या लेखांची हस्तलिखिते वाचणे म्हणजे खरोखरच आमची एका बाजूने सत्त्वपरीक्षा होती. कसल्या तरी मडक्या पाठकोऱ्या कागदावर कसल्या तरी शाईने ते लेख लिहीत असत. त्यातच ठिकठिकाणी 'काकपदें' घालून ज्यादा शब्द आणि मजकूर लिहिलेला असे. ज्या दिवशी टपालातून सावरकर यांचा लेख यायचा त्या दिवशी आम्ही सर्व संपादक मंडळी त्या लेखांचे मोठ्याने वाचन करीत असू. किर्लोस्करांच्या मासिकाचे पहिले नाव 'किर्लोस्कर खबर' असे होते, पण तात्यांनी त्यातील 'खबर' हा शब्द उर्दू आहे म्हणून तो काढण्यास सांगितले व किर्लोस्करांनी आपल्या मासिकाचे नाव 'किर्लोस्कर' असे ठेवले. (Veer Savarkar Jayanti 2026)

रत्नागिरीच्या एका हायस्कूलमध्ये 'कीचक वध' नाटक व्हायचे होते. हा समारंभ वीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. या नाटकाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी सैरंध्रीची भूमिका करणारा मुलगा आजारी पडला. आता उद्या काय करायचे हा प्रश्न पडला. सावरकरांच्या कानी हा प्रकार गेला. ते नाटकाच्या दिग्दर्शकाला म्हणाले, "चिंता करू नका. नाटकाचा प्रयोग ठरल्या वेळीच होईल. मी पाहतो." असे म्हणून ते थेट त्यावेळी रत्नागिरीत सुरू असलेल्या 'शारदा संगीत मंडळी' या नाटकाच्या बिऱ्हाडी गेले व त्या नाटक मंडळींचे संचालक बोरकर यांना म्हणाले, "बोरकर कंपनीत एखादा हुशार धीट एकपाठी असा कोणी मुलगा असला तर त्याला हाक मारा पाहू!" बोरकरांनी चटकन दत्तारामला हाक मारली. सावरकर त्याला काय विचारणार आहेत किंवा कसली परीक्षा घेणार आहेत याची बोरकरांना कल्पना येईना. सावरकरांनी दत्तारामला जवळ बोलावले व म्हणाले, "हे पहा बाळ, मी आत्ता तुझ्याकडे 'कीचक वध' नाटकातील सैरंध्रीची नक्कल पाठ करायला देणार आहे. उद्या रात्री तू ते काम करायचे, करशील ना?" दत्तारामने कबूल केले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दत्तारामचे सैरंध्रीचे काम दृष्ट लागण्याइतके गोड झाले. संपल्यावर वीर सावरकर आत आले. त्यांनी दत्तारामला जवळ घेऊन आम्हाला सांगितले, "हा मुलगा उद्या फार मोठा नट होणार आहे. सावरकरांनी उच्चारल्याप्रमाणे मास्टर दत्ताराम यशस्वी नट झाले." (Veer Savarkar Jayanti 2026)

कुमार रेगे यांनी लिहिलेली एक आठवण आहे, त्यांनी वर्णन केले आहे, त्यात म्हटलेय १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर रत्नागिरीस बंधमुक्त होऊन आले. साधारण रोज सकाळी अंगात निळसर रंगाचा व काळसर रेषा असलेला कोट घालून तात्या फिरावयास बाहेर पडत. हातात छत्री व डोक्यावर गोल काळी टोपी असे. चेहऱ्यावर तर प्रखर बुद्धिमत्ता व सोसलेल्या कष्टांची कठोर छाया अगदी स्पष्टपणे द्रुगोचर झालेली असावयाची. त्यांचे एक काल्पनिक चित्र काढण्याची मला तीव्र इच्छा झाली. मी रोज त्यांना न्याहाळून पाहायचा क्रम आखला. तीन-चार दिवसांत त्यांचे एक मोठे चित्र काढून ते त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गात असलेल्या एका दुकानाबाहेर जाऊन ठेवले. एके दिवशी रस्त्याने जात असता तात्यांची दृष्टी त्या कलाकृतीवर गेली व ते विस्मयाने पटकन त्या ठिकाणी थांबले. अवघ्या तेरा वर्षांच्या एका मुलाने इतके आपले सुंदर चित्र काढलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले व मला आपल्या घरी भेटण्यासाठी त्यांनी बोलावले. मी भीत त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. माझ्या पाठीवरून आत फिरवत ते म्हणाले, "बाळ, तू पुढे मोठा चित्रकार होशील.'' तात्यांनी मला दहा रुपये बक्षीस दिल्याचेही आठवते. मी त्यांच्याकडे त्यांचे हस्ताक्षर प्रशस्तीपत्र मागितले. त्यात त्यांनी लिहिले, "कुमार रेगे याने काढलेले माझे चित्र मी पाहिले. शिष्यवृत्ती मिळवून त्यास उत्तेजन मिळाल्यास तो चित्रकलेत चांगलाच नावलौकिक मिळवील, असे मला वाटते." अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी मला जी शाबासकी दिली. त्यामागे तात्यांच्या सदिच्छांचा फार मोठा भाग आहे. सावरकर कोल्हापूरला गेले तेव्हा त्यांनी भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओला भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्या काळी तेथील चित्रपटसृष्टीला असलेल्या इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन सर्व चित्रपटसृष्टीला सरस्वतीचे वरदान दिले. त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सावरकरांसारख्या परीसामुळे सोने झाले. आणखी कितीतरी उदाहरणे असतील जी काळालाच माहिती आहेत! (Veer Savarkar Jayanti 2026)

(लेखक सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री आहेत.)

हेही पहा - https://www.youtube.com/watch?v=pa7gT7P1eh4&t=20s

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post