मयूर सुकाळे
Veer Savarkar Jayanti 2026 लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड असल्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे या छोट्याशा गावातून नशिबाने मला मुंबईसारख्या महानगरात आणून उभे केले.
नातेवाईकांचे आशीर्वाद आणि गुरुजनांचे पाठबळ लाभल्यामुळे आज मुंबईसारख्या शहरात 'एक पार्श्वगायक' अशी ओळख निर्माण करता आली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक यशस्वी क्षणांना स्वर्णालंकृत करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारधारेने केले आहे. (Veer Savarkar Jayanti 2026)
वीर सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या ध्येयासाठी आयुष्य वेचणारे शिवाजी महाराज जसे रयतेचे राजे होते, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी, हिंदुहृदयसम्राट आणि प्रखर राष्ट्रभक्त होते. ही दोन्ही महान व्यक्तिमत्त्वे मला सतत प्रेरणा देत असतात. एक कलाकार म्हणून विचार करताना मला नेहमी जाणवते की, अफाट शब्दसंपदा एखाद्या कलाकाराला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवू शकते. वीर सावरकर यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द दिले आणि लिपी सुधारण्याचाही प्रयत्न केला. ते लेखक होते, कवी होते, वक्ते होते, संशोधक होते, नाटककार होते, गझलकार होते; अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. समाज प्रबोधनासाठी त्यांनी नाटके, पोवाडे, फटके आणि लावण्या लिहिल्या. अशा शतपैलू व्यक्तिमत्त्वाची बीजे त्यांच्या लहानपणीच्या संस्कारांत रुजली होती. त्यांच्या या व्यापक कार्याची ओळख करून घेताना मला माझे गावाकडचे बालपण आठवते आणि ध्येयासाठी झपाटून जाण्याची प्रेरणा मिळते. (Veer Savarkar Jayanti 2026)
वीर सावरकर लिखित पोवाडा गाताना…
'शतजन्म शोधिताना…' या कार्यक्रमात मी जेव्हा वीर सावरकर लिखित तानाजींचा पोवाडा गातो, तेव्हा माझ्या नसानसांत राष्ट्रभक्ती संचारते. अंगावर रोमांच उभे राहतात. वीररसाने ओतप्रोत भरलेला हा पोवाडा गाताना मी 'त्या' स्वातंत्र्याचा मनापासून अनुभव घेत असतो, ज्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची अक्षरशः राखरांगोळी केली. हा पोवाडा मला केवळ आदरणीय नंदेश उमप दादा यांच्या प्रेरणेमुळे प्रभावीपणे सादर करता येतो. तसेच 'शतजन्म शोधिताना…' या कार्यक्रमाच्या संकल्पनाकार आदरणीय मंजिरी मराठे यांच्या प्रोत्साहनामुळे या कार्यक्रमात गाताना मला नेहमीच निर्भेळ आनंद मिळतो. या कार्यक्रमाच्या संगीतकार डॉ. वर्षा भावे आणि संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या अप्रतिम संगीतामुळे हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचायला मदत झाली. (Veer Savarkar Jayanti 2026)
मी देश-विदेशात अनेक कार्यक्रम करतो; पण वीर सावरकर लिखित पोवाडा सादर करताना हमखास 'Once More' मिळतो. आणि मला याची पूर्ण जाणीव आहे की, तो 'Once More' मला नसून त्या क्षणी माझ्यात संचारलेल्या वीर सावरकरी प्रतिभेला असतो. मंजिरी मराठे लिखित 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' हे पुस्तक वाचताना मी नेहमी त्यांच्या विचारांनी भारावून जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अफाट लेखनशैली कार्यक्रम करतानाही पदोपदी जाणवते आणि मला पुढील वाटचालीसाठी नवे बळ मिळत राहते.सावरकर लिखित 'माझी जन्मठेप', धनंजय कीर लिखित 'स्वातंत्र्यवीर सावरकर', श्री. पु. गोखले लिखित 'सावरकरांशी सुखसंवाद' आणि विद्याधर गोखले लिखित 'झंझावात' ही पुस्तके वाचताना आजही मन गहिवरून येते. छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझ्यासाठी कायम प्रेरणेचा अखंड स्रोत राहतील, हे निर्विवाद सत्य आहे. (Veer Savarkar Jayanti 2026)
(लेखक पार्श्वगायक आहेत.)
