Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Veer Savarkar : पहावे मग जगून आणखी थोडे!

  • मंजिरी मराठे

अंदमानच्या कराल कोठडीत आत्यंतिक छळ, यातना आणि श्रमामुळे वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) प्रकृतीनं सुरुवातीची काही वर्ष तग धरली. पण नंतर मात्र त्यांना शरीर साथ देईनासं झालं.

आजारपण आलं तरी त्यांची कोठडीबंदी काही सुटली नव्हती. कारण काराधीप डेव्हिड बॅरीला (David Barry) वाटलं तरच तो बंदीवान आजारी मानला जात असे. तोपर्यंत औषधोपचाराविनाच बंदीवानांना दिवस काढावे लागत. एकदा सावरकरांचा आमांशाचा विकार खूपच बळावला, अंगात कायमच शंभरपर्यंत ताप राहू लागला, तेव्हा कुठे त्यांना रुग्णालयात नेण्यात येऊन उपचार सुरू झाले. सामान्य बंदीवानाला आजारपणात रुग्णालयात थोडाबहुत आराम करायला मिळत असे पण ती सवलत राजबंदीवानांना मात्र मिळत नसे. आजार विकोपास गेल्यावर त्यांना रुग्णालयात पाठवत.

सेल्युलर कारागृहात (Cellular Jail) बंदीवानांनी आपल्या मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे, सावरकरांच्या (Veer Savarkar) केलेल्या प्रयत्नांमुळे बंदीवानांच्या होणाऱ्या छळाबद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे यावेळच्या आजारपणात मात्र सावरकरांची जरा बरी व्यवस्था केली गेली. पण त्याला आता खूप उशीर झाला होता. त्यांच्या प्रकृतीस काही उतार पडेना. अंगात भरलेला ताप उतरावा यासाठी त्यांना सारखं क्वीनीन देत. त्यामुळे त्यांना आमांश आणि रक्ताची आव होऊ लागली. अन्न पचत नसल्यामुळे अधिकच अशक्तपणा येऊ लागला. क्षयाचीच लक्षणं दिसू लागली होती. कारागारात मन रमवण्यासाठी ते जमेल तसं वाचन करत, कारागृहातील भिंतींची लेखणी करून लिहिलेल्या कविता स्मृतीवर कोरून ठेवत. पण मज्जातंतू क्षीण झाल्यामुळे त्यांना वाचन, बौद्धिक संवादही झेपेनासे झाले. जरा वाचल्यावर किंवा बौद्धिक संवाद साधल्यानंतर त्यांचा ताप एक-दोन अंशांनी चढत असे. त्यामुळे वाचन, कविता रचणं त्यांनी सोडून दिलं, ते खाटेवर पडून राहू लागले. कारागारात मुळातच वेळ खायला उठत असे, दिवस- रात्र लांबच लांब आणि कंटाळवाणी भासत असे. त्यातच आमांशाच्या वेदना आणि तापात तो वेळ सावरकरांना अधिकच क्लेशकारक वाटू लागला आणि सुरु झाला मनाशी मनाचा संवाद.

एखाद्या वेळेस त्यांना वाटे, 'कारागारात आपण आजारी पडलो म्हणून आपल्याला जास्त त्रास होतो आहे. दुसरं मन म्हणे, कारागारावरच सर्व दोष लादणं अन्याय्य आहे. जे बाहेर आहेत ते काय या रोगांनी आजारी पडत नाहीत? मलेरिया, आमांश आणि क्षय यांना राजवाड्यांतूनही मज्जाव नसतो. मुंबईसारख्या विद्युद्दीपांनी झगमगलेल्या नगरांतूनही घरोघर मरणाचं कण्हणं ऐकू येत नाही का? एकेका घरात चार-चार मरणाची अंथरुणं पसरलेली नसतात काय? बाहेरही ही दुःखं भोगावीच लागतात. अशा शेकडो झोपड्या आहेत- अशी शेकडो गावं आहेत, जेथे सहस्रावधी दीन दरिद्री याच आजारांनी तळमळत पडतात तेव्हा तुला कारागारात जो डॉक्टर, जी शुश्रूषा आणि जी औषधं मिळत आहेत त्यांचा लवलेशही लाभ त्यांना मिळत नाही! तुझ्या कारागारातील या परतंत्र दुर्दशेहूनही त्यांची ती स्वतंत्रतेची दुर्दशा अधिक असह्य आहे. आजार आणि त्यांचा सेनापती मृत्यू, हा कारागारात वरचेवर भेटतो हे जरी खरं असलं तरी बाहेर अगदी भेटतच नसतो असं नाही.

राष्ट्रस्वातंत्र्याच्या महान ध्येयासाठीच हे कारागार, हा बंदीवास, ही तपस्या तू आणि तुझे हे सहतपी आचरीत आहेत. राष्ट्रीय उषःकाल होण्यासाठी त्या अंधारकोठड्यांतील अंधाराच्या घटिका मोजीत बसणं अत्यंत अवश्यच असतं. मग कारागारातील जीवन बाह्य आणि स्वतंत्र जीवनाहून हीनतर किंवा व्यर्थतर का वाटावं?' पहिल मनं स्वतंत्र जीवनाचा विचार करू लागल्यावर, त्यांच्याच दुसऱ्या मनानं त्यांना पुन्हा समजावलं, 'वेड्या मना, या कारागाराच्या भिंतीबाहेर का स्वातंत्र्य आहे? या दगडी भिंतींपलीकडे सृष्टिनियमांच्या भिंती आहेत! मनाला 'इच्छेच्या, क्षितिजाच्या भिंती' आहेत! या कारागाराच्या भिंतींनी तू जितका बद्ध झाला आहेस तितकेच ते बाहेरचे तुला स्वतंत्र वाटणारे लोकही बद्ध झाले आहेत.'

पंधरा दिवस तरी सुख मिळते तर!

जराजर्जर झालेली सावरकरांची (Veer Savarkar) प्रकृती फार काही सुधारली नाही तेव्हा त्यांना पाच क्रमाकांच्या चाळीच्या तिसऱ्या तळावर (मजल्यावर) अगदी एकांतात ठेवण्यात आलं. प्रकृती कधीतरी सुधारेल असं म्हणता म्हणता वर्ष दीड वर्ष सरलं. सतत काही ना काही दुखणं त्यांच्या मागं लागलेलं असे. त्यामुळे आता हे देहवस्त्र अगदी पांघरता न येण्याइतकं जीर्ण झालं आहे, असं त्यांना वाटू लागलं. आज आमांश, उद्या रक्तामांश, परवा ताप, तेरवा आणखी काही, असं ते सोशीत राहिले. कारागारातून सुटण्याचा काही संभव दिसत नव्हता आणि कारागार सुटत नाही तोपर्यंत प्रकृती सुधारणंही कठीण होतं. पुढे उपयोगी पडेल म्हणून कसंबसं तोलून धरलेलं शरीर त्यांना फेकून द्यावंसं वाटू लागलं. पण पुन्हा एकदा त्यांनी मनावर विजय मिळवला. दुःखात किती काळ रडत बसणार, असा विचार करत त्यांनी किती दिवस देहधारण सुसह्य असतं आणि किती दिवस कष्टप्रद होतं ते ठरविण्यासाठी, काही त्रास झाला तर त्याच्या किंवा दिवस सुसह्य गेला तर त्याच्या खुणा भिंतीवर करून ठेवायला सुरुवात केली. 'दोन महिन्यांनी बेरीज केल्यानंतर, साठ दिवसांत पंधरा-एक दिवस प्रकृती जिवंत राहावंसं वाटावी इतकी बरी' असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि ते मनाशीच म्हणाले, "म्हणजे अजून सर्वच दुःखमय नाही. पंधरा दिवस तरी हा देह सुखमय होतो. पहावे तर मग जगून आणखी थोडे!"

पण अशा मनाच्या मनोऱ्यावर सदोदित थोडंच राहता येणार होतं. 'रुग्णालयात असताना वजन ९५ पौंडावर जाऊन अत्यंत क्षीण झालेलं शरीर, सततचा ताप, पोटात अन्न जात नाही म्हणून आलेला थकवा, क्षयाची चिन्हं, ताप नेहमी अंगात कणकणत असलेला, आपलं असं जवळ कोणी नाही, शत्रूप्रमाणे लेखलेल्या आणि लेखणाऱ्यांच्या बंदीत, अपमानात, निराशेत, कोणाशी प्रेमाचे शब्द बोलावयाची चोरी, थोडे खालीवर बसण्याउठण्याची चोरी अशा स्थितीत दोन-तीन महिने प्रकृती इतकी विकोपास गेली की केव्हा मृत्यूचा हिसडा बसेल आणि जीवनाचा धागा तुटेल याचा मुळीच कोणास भरवसा वाटेना. जगावयाचे म्हटलं तरी जगणं अशक्य होणार असं दिसू लागलं.' अशाच अगदी क्षीणतेच्या एके दिवशी जीवनाच्या शेवटचा निरोप म्हणून त्यांनी ''मरणोन्मुख शय्येवर'' ही कविता केली आणि 'ये मृत्यो ये, यावयासी निघालाची असशील जरी, ये तरी सूखे' असं म्हणत त्यांनी मृत्यूला आवतण दिलं. पण तो मृत्यू काही सामोरा यायला धजावला नाही, तोच हरला.

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post