स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त शनिवार, ३० मे २०२६ या दिवशी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आदर्श विचारांना अनुसरून संरक्षण, विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या मान्यवरांना, तसेच सावरकरी विचारांच्या प्रचार-प्रसारात योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशी, स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह असिलता सावरकर – राजे, मेजर शंतनु घाटपांडे यांच्या पत्नी अमृता घाटपांडे, तन्मय बूनकर त्यांचे सहकारी रिषभ काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. (Veer Savarkar)
यंदाच्या वर्षीचा ‘शौर्य पुरस्कार’ ५ वी बटालियन, ९ गुरखा रायफल्सचे सेनापदक प्राप्त मेजर शंतनू घाटपांडे यांना प्रदान करण्यात आला. मेजर शंतनू घाटपांडे हे ऑन ड्युटी असल्याने ते या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमृता महाजन-घाटपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मेजर शंतनू घाटपांडे यांचे आई-वडील आणि कुटुंबाचे सदस्यही उपस्थित होते. राष्ट्र सुरक्षा, अदम्य साहस आणि कर्तव्यनिष्ठ सैन्य नेतृत्वाच्या गौरवशाली परंपरेला आपल्या शौर्य, पराक्रम आणि अद्वितीय रणकौशल्याने नवी उंची देणारे, वीर सैनिक मेजर शंतनू घाटपांडे यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करणे ही स्मारकासाठी अभिमानाची बाब आहे. (Veer Savarkar)
मणिपूरमधील अतिसंवेदनशील आणि अशांत भागात कमांडर म्हणून कार्यरत असताना, मेजर घाटपांडे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अद्वितीय धैर्य, संयम आणि रणनीतिक नेतृत्व दाखवले. भारतीय सेनेच्या गौरवशाली परंपरेचे आपण तेजस्वी प्रतीक आहात.
मेजर शंतनू घाटपांडे यांचा अल्पपरिचय
मेजर शंतनू घाटपांडे (५/९ जीआर) यांची मणिपूरमधील अतिसंवेदनशील भागात कॉलम कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ४ ऑक्टोबर २०२३ मध्ये, सशस्त्र दंगेखोरांनी एका गावावर हल्ला करून अंदाधुंद गोळीबार केला, अशा धोकादायक परिस्थितीत मेजर घाटपांडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, जवानांसह घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या शौर्याने दंगेखोरांना प्रत्युत्तर देत त्यांना माघार घ्यायला भाग पाडले. मेजर घाटपांडे यांच्या या साहसी आणि तात्काळ कारवाईमुळे अनेक निरपराध नागरिकांचे प्राण वाचले आणि मोठी हानी टळली. (Veer Savarkar)
त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा असाच एक हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांनी अग्रभागी राहून बटालियनचे प्रभावी नेतृत्व केले आणि आपल्या शौर्याच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच त्यांनी एक मजबूत गुप्तचर यंत्रणा उभी करून नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये दोन यशस्वी शोध मोहिमा राबवल्या, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यांच्या या अद्वितीय शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना "सेना मेडल (गॅलंट्री)" प्रदान करण्यात आले.
काय म्हणाल्या अमृता महाजन-घाटपांडे?
याप्रसंगी मेजर शंतनू घाटपांडे त्यांच्या पत्नी अमृता महाजन-घाटपांडे म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाशी जोडलेला हा सन्मान आमच्यासाठी विशेष महत्त्व ठरतो. सावरकर (Veer Savarkar) यांनी राष्ट्रप्रेम, शौर्य, कर्तव्य आणि राष्ट्रीय एकात्मतेला जीवनात सर्वोच्च स्थान दिले. त्यांची दूरदृष्टी, देशभक्ती आणि मातृभूमीबद्दलचे समर्पण आजही देशातील अनेक पिढ्यांना प्रेरित करत आहे. अशाच कर्तव्यनिष्ठेचा आणि धैर्याचा परिचय त्यांनी मणिपूरमधील आपल्या तैनातीदरम्यान अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत दिला. कठीण आणि संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या संयम, नेतृत्व आणि शौर्याने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, तोच आज या सन्मानाचा आधार आहे. मणिपूरमधील अत्यंत संवेदनशील भागात ‘कॉलम कमांडर’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये, तेथील काही गावांवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या उग्रवाद्यांनी हल्ला केला. परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि निष्पाप नागरिकांचे प्राण धोक्यात होते. ४ ऑक्टोबर या दिवशी उग्रवाद्यांनी एका गावावर बेछूट गोळीबार करत हल्ला केला. अशा वेळी त्यांनी आणि त्यांच्या टीमने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तातडीने घटनास्थळ गाठले आणि भीषण गोळीबार व तणावाच्या परिस्थितीत चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे उग्रवाद्यांना माघार घेणे भाग पडले. यानंतर गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले.
त्यांनतर, ७ ऑक्टोबर या दिवशी उग्रवाद्यांनी गाव पेटवून देण्याच्या उद्देशाने पुन्हा हल्ला केला. त्यावेळीही त्यांनी अतुलनीय साहस आणि नेतृत्वाचा परिचय देत आपल्या तुकडीचे नेतृत्व केले. या मोहिमांदरम्यान २०० हून अधिक लोकांचे प्राण वाचवता आले आणि अनेक कुटुंबे सुरक्षित राहिली. माझ्यासाठी सर्वात भावनिक गोष्ट ही आहे की, त्यांनी या मोहिमांबद्दल किंवा तिथल्या कठीण परिस्थितीबद्दल कधीही घरात काही सांगितले नाही, की कधी चर्चाही केली नाही. इतर बहुतांश भारतीय सैनिकांप्रमाणे त्यांनीही याला केवळ आपले कर्तव्य मानले, असे अमृता महाजन-घाटपांडे म्हणाल्या. (Veer Savarkar)
