मी अवघा चार ते पाच वर्षांचा असताना, पुण्याच्या एस. पी. कॉलेजच्या (SP College) मैदानावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Veer Savarkar) एक सभा झाली होती. आम्ही जवळच राहत असल्याने माझे वडील मला त्या सभेला घेऊन गेले आणि त्यांनी मला आपल्या खांद्यावर बसवून सावरकरांचे दर्शन घडवले.
त्या वयात फारसे काही कळत नव्हते, मात्र सावरकरांची ती भव्य प्रतिमा आज इतक्या वर्षांनंतरही माझ्या मनावर तशीच कोरलेली आहे. त्यांच्या हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांचा मी कायमच पुरस्कार्ता राहिलो आहे, अशा शब्दांत ख्यातनाम चित्रकार सुहास बहुळकर यांनी आठवणी सांगितल्या. (Veer Savarkar)
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त शनिवार, ३० मे २०२६ या दिवशी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आदर्श विचारांना अनुसरून संरक्षण, विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या मान्यवरांना, तसेच सावरकरी विचारांच्या प्रचार-प्रसारात योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशी, स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह असिलता सावरकर – राजे, मेजर शंतनु घाटपांडे यांच्या अमृता महाजन – घाटपांडे, तन्मय बूनकर त्यांचे सहकारी विशक काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. (Veer Savarkar)
या कार्यक्रमात सुहास बहुळकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सावरकरांचा पुतळा, मानपत्र, पुस्तके आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे होते. हे माझे परमभाग्य आहे की माझ्या तरुणपणी माझा सावरकरांशी (Veer Savarkar) आणि सावरकर स्मारकाशी जवळचा संबंध आला. मला त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व जवळून जाणून घेता आले. सावरकरांचे जे उदात्त ध्येय होते, ते सावरकर स्मारकाच्या माध्यमातून आणि इतर ठिकाणी चित्र व शिल्पांच्या रूपाने काही प्रमाणात का होईना साकार करण्याची संधी मला मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही सुहास बहुळकर म्हणाले.
’राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालय’ : काळाची गरज
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये एक भव्य ‘राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालय’ उभारले जावे, अशी एक सुंदर योजना जयंतराव टिळकांनी आखली होती. मला पूर्ण विश्वास आहे की रणजित सावरकर, अरुणजी आणि त्यांचे सर्व सहकारी ही योजना नक्कीच पूर्णत्वास नेतील. हे संग्रहालय केवळ मुंबईचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक खूप मोठे आकर्षण केंद्र ठरेल; कारण हे संग्रहालय भारताचा एक ‘अज्ञात इतिहास’ जगासमोर आणणारा मुख्य स्त्रोत बनणार आहे, असेही ते म्हणाले. (Veer Savarkar)
इतिहासाचे विकृतीकरण आणि स्मारकाचे महत्त्व
आजकाल आपल्याकडे असा प्रचार केला जातो की, भारताला स्वातंत्र्य केवळ अहिंसेच्या मार्गानेच मिळाले आहे आणि त्यात सशस्त्र क्रांतीचे काहीच योगदान नाही. या चुकीच्या प्रचाराला चोख उत्तर देण्याचे काम हे स्मारक करेल. या माध्यमातून सावरकरांचे अलौकिक जीवनकार्य आणि त्यांचे जीवनध्येय लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचेल, असेही सुहास बहुळकर म्हणाले. (Veer Savarkar)
सुहास बहुळकर यांचा परिचय
सुहास बहुळकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ चित्रकार, कलासंशोधक, लेखक आणि क्युरेटर म्हणून प्रसिद्ध आहेत. "बॉम्बे स्कूल" चित्रकला परंपरेचे जतन आणि संशोधन करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. १० ऑक्टोबर १९५४ रोजी पुण्यात जन्मलेल्या बहुळकर यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले आणि तेथे २० वर्षे अध्यापनही केले. त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने भारतासह पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क आदी शहरांत भरली. राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांच्या चित्रांचा समावेश आहे. त्यांनी कला इतिहास, चित्रकला आणि शिल्पकलेवर अनेक पुस्तके लिहिली असून त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार व डी.लिट. सन्मान प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनेक तैलचित्रे त्यांनी काढली आहेत. भव्य भित्तिचित्रे आणि सांस्कृतिक प्रकल्पांमधील त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित भव्य भित्तिचित्र साकारले. याच स्मारकात भारतीय सशस्त्र स्वातंत्र्यलढ्यावर आधारित १४ फूट x ९० फूट आकाराचे रिलीफ म्युरल आणि ५००० चौ. फूटांचे सिरेमिक म्युरलही त्यांनी उभारले. या कलाकृतींमध्ये बहादुर शाह झफर ते सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंतच्या क्रांतिकारकांचा इतिहास प्रभावीपणे साकारण्यात आला आहे.
