Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध: पंतप्रधान

आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध: पंतप्रधान

वी दिल्ली, २७ ऑगस्ट (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत एक प्रणाली विकसित केली जात आहे.

ही प्रणाली प्रतिभा ओळखण्यापासून ते जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर साहाय्य करेल.

ते म्हणाले की, क्रीडा विज्ञान, सराव, प्रशिक्षण आणि अनुभव यांची देवाणघेवाण करण्यासाठी सरकार इतर देशांसोबत सहकार्य वाढवत आहे. 'खेलो इंडिया संवाद' हे या कामाला किती गांभीर्याने घेतले जात आहे याचे एक उदाहरण आहे.

पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'खेलो इंडिया संवादा'ला संबोधित केले. या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांना भारताच्या क्रीडा प्रवासाशी जोडणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि युवा-नेतृत्वाखालील विकसित भारताच्या उभारणीसाठी त्यांच्या कल्पनांचे योगदान मिळवणे हा आहे.

आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, 'खेलो इंडिया संवाद' हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नाही. खेळाडूंच्या कल्पना आणि आकांक्षांना देशाच्या स्वप्नांशी जोडण्याचे हे एक उत्तम माध्यम आहे. ते म्हणाले, आपण अनेकदा ऐकतो की निरोगी समाजासाठी क्रीडावृत्ती आवश्यक आहे. पण मैदानावर सहभागी झाल्याशिवाय ती विकसित करणे खूप कठीण आहे. खेळ आपल्याला केवळ चॅम्पियनच नाही, तर उत्तम स्पर्धक बनण्यासही शिकवतात.

नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, लाल किल्ल्यावरून त्यांनी ५ ते १५ वयोगटातील मुलांमधील प्रतिभा ओळखण्यासाठी एका व्यापक प्रतिभा शोध मोहिमेची घोषणा केली होती. मुलांना कोणत्या खेळांमध्ये रस आहे हे पाहण्यासोबतच, कोणता खेळ त्यांच्यासाठी सर्वात योग्य आहे हे देखील पाहणे आवश्यक आहे. आपण त्यांना त्यानुसार प्रशिक्षण दिले पाहिजे. या संदर्भात तुम्हाला सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आमचे सरकार २१ व्या शतकासाठी एक आधुनिक क्रीडा प्रणाली विकसित करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे.

आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, देशासमोर सध्या एक मोठे क्रीडा आव्हान आहे. भारतीय संघ निम्म्या ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत नाही आणि हे अनेक दशकांपासून सुरू आहे. त्यांनी सर्फिंग आणि सपोर्ट क्लायंबिंगची उदाहरणेही दिली. ते म्हणाले, "आपल्या देशाची लोकसंख्याशास्त्रीय आणि भौगोलिकदृष्ट्या मजबूत स्थिती आहे, तरीही या खेळांमध्ये आपले प्रतिनिधित्व मजबूत नाही."

ते पुढे म्हणाले, "आज देशाचा प्रयत्न या खेळांमधील परिसंस्था विकसित करण्याचा आणि पुढील विस्ताराच्या शक्यतांचा विचार करण्याचा आहे." पंतप्रधानांनी २९ ऑगस्ट रोजी येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आगाऊ शुभेच्छा दिल्या आणि मेजर ध्यानचंद यांचे स्मरण केले. त्यांनी नमूद केले की, १०० वर्षांपूर्वी, भारतीय लष्कराच्या हॉकी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता, ज्यात मेजर ध्यानचंद यांचा समावेश होता. तो दौरा भारत-न्यूझीलंड क्रीडा संबंधांचा १०० वा वर्धापनदिन साजरा करतो.

राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ च्या सोहळ्याचा एक भाग म्हणून, 'मेरा युवा भारत' (माझा भारत) द्वारे आयोजित या कार्यक्रमात देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांतील युवक सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय विकासाच्या अजेंड्याच्या केंद्रस्थानी युवकांच्या आकांक्षांना ठेवून एक सुदृढ, शिस्तबद्ध आणि क्रीडा-केंद्रित राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरिक जबाबदारी, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्रउभारणी यांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणेल. यामुळे युवकांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल आणि ते सक्षम होतील याची खात्री केली जाईल. तसेच, त्यांचे विचार आणि दृष्टिकोन हे भारताच्या युवा आणि क्रीडा परिसंस्थेवरील सध्या सुरू असलेल्या चर्चेचा भाग बनतील.

-----------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi