मुंबई, 03 जुलै, (हिं.स.)। बॉलिवूडचा सुपरस्टार आमीर खानने आपली मैत्रीण गौरी स्प्राट हिच्याशी होणाऱ्या लग्नाच्या वृत्ताला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या दुजोरा दिला आहे. अलीकडेच 'प्रीतम अँड पेड्रो' या वेब सीरिजच्या स्क्रीनिंगला उपस्थित असताना, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने ५ जुलै रोजी गौरीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे जाहीर केले.
आमीरने सांगितले की, हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने आणि खाजगीरीत्या त्याच्या घरी, दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत पार पडेल. तसेच, आपल्या आयुष्यातील या नवीन टप्प्यासाठी त्याने पापाराझी आणि चाहत्यांकडून आशीर्वादही मागितले.
आमीर खानने स्पष्ट केले की, हा विवाह मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी 'कोर्ट मॅरेज'च्या स्वरूपात होईल. या सोहळ्याला केवळ कुटुंबीय, अभिनेत्याची मुले आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहतील. हा कार्यक्रम सकाळी किंवा दुपारी होण्याची शक्यता आहे. लग्नानंतर कोणताही भव्य रिसेप्शन सोहळा होणार नाही आणि संपूर्ण कार्यक्रम खाजगीच ठेवला जाईल, असेही अभिनेत्याने स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, आमीर खानने आपल्या ६० व्या वाढदिवशी गौरी स्प्राटची आपली जोडीदार म्हणून पहिल्यांदाच सर्वांसमोर ओळख करून दिली होती. हे जोडपे गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांच्या सहवासात आहे. आमीरचे हे तिसरे लग्न आहे आणि या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

