जळगाव, ०२ नोव्हेंबर (हिं.स.) : ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांच्या निर्देशानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या वतीने यावल तालुक्यातील आसराबारी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नागरिकांना योजनांची माहिती, विविध शासकीय दाखल्यांचे वितरण, आरोग्य तपासणी तसेच विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ झाले.
महसूल विभागामार्फत १० जातीचे दाखले, ग्रामविकास विभागामार्फत ३० मनरेगा जॉब कार्ड आणि १० जन्मदाखल्यांचे वितरण करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत १४ रेशनकार्ड वितरित करण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बचत गट तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले.
कृषी विभागामार्फत महिला शेतकरी आणि सेंद्रिय शेती योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत २५ गोल्डन आभा व आभा कार्डसंदर्भातील सेवा पुरविण्यात आली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून एकूण १०१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण योजनेंतर्गत पाच लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय भूमी अभिलेख, महसूल आणि इतर विभागांच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पायाभूत सुविधांचाही घेतला आढावा
लाभार्थी शिबिराच्या माध्यमातून परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांशी संबंधित समस्यांचाही आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या उपक्रमामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यास मदत झाली.या शिबिराला प्रांताधिकारी बबनराव काकडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर
