जळगाव, 02 नोव्हेंबर (हिं.स.)आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात बँक कर्मचाऱ्यांमधील असंतोष आता रस्त्यावर उतरला आहे. जळगावातील आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे.
जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि खासगीकरणाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. केंद्र सरकार आणि बँक व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात देशभरातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करून ती विदेशी कंपनीच्या घशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. या निर्णयामुळे बँकेच्या भवितव्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या हितालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
खासगीकरणाचा निषेध करण्यासाठी जळगावातील आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २ आणि ३ नोव्हेंबरला काम बंद ठेवत आंदोलनात सहभाग घेतला. काव्यरत्नावली चौकात झालेल्या निदर्शनांदरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बँकेचे खासगीकरण तातडीने थांबवावे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दिवाळीचा सण जवळ आला असताना दोन दिवसांच्या काम बंद आंदोलनामुळे आयडीबीआय बँकेच्या नियमित व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
सणासुदीच्या खरेदीसाठी तसेच इतर आर्थिक कामांसाठी बँकेत आलेल्या ग्राहकांना कामकाज बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांची गैरसोय वाढली आहे.आयडीबीआय बँकेचे खासगीकरण तातडीने थांबवावे, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात आणि व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. याकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर
