लातूर, 31 जुलै (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असली, तरीही या पावसाचा तलावांमधील पाणीसाठ्यावर अपेक्षित परिणाम झालेला दिसून येत नाही.
शहरालगत असलेल्या वाकी नदीवरील तलावात अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नसून, तालुक्यातील बहुतांश लहान-मोठे तलावही कोरडेच आहेत.
यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, सध्याचा रिमझिम पाऊस पिकांसाठी काही प्रमाणात दिलासादायक असला तरी, सिंचनासाठी आवश्यक असलेले तलाव भरल्याशिवाय शेतकऱ्यांना खरी दिलासा मिळणार नाही. तलाव आणि जलाशयांमध्ये मुबलक पाणी साठल्यासच आगामी काळात शेतीला पुरेसा पाण्याचा आधार मिळू शकतो.
शेतकऱ्यांच्या मते, सध्या सुरू असलेला पाऊस वातावरणात गारवा निर्माण करत असला तरी तो पुरेसा नाही. अजूनही जोरदार आणि सलग पावसाची आवश्यकता असून, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यासच तलाव भरतील आणि खरीप तसेच उसाच्या पिकाला मोठा फायदा होईल. दरम्यान, प्रशासन आणि शेतकरी वर्गाचे लक्ष आता पुढील काही दिवसांतील पावसाकडे लागले असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत संपूर्ण तालुका आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

