Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अहमदपूरमध्ये बुलढाणा अर्बन सोसायटीत ९९ लाखांचा अपहार

अहमदपूरमध्ये बुलढाणा अर्बन सोसायटीत ९९ लाखांचा अपहार

बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

लातूर, १० नोव्हेंबर (हिं.स.) : बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अहमदपूर शाखेत कर्जाच्या परतफेडीसाठी जमा केलेली रक्कम बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्यांच्या आधारे इतर व्यक्तींच्या खात्यांवर वळवून तब्बल ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संतोष मारोतीराव कोटगीरे (वय ५०, रा. फुलनगर, अहमदपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. कोटगीरे हे श्रद्धा ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून आडत व्यवसाय करीत होते. व्यवसायासाठी त्यांनी बुलढाणा अर्बन सोसायटीच्या अहमदपूर शाखेतून सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी २०२१ ते २०२२ या कालावधीत विविध धनादेश, रोख रक्कम आणि आरटीजीएसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली होती.

मात्र, कर्जफेडीसाठी जमा केलेली रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा न करता इतर व्यक्तींच्या खात्यांवर वळविण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याशिवाय बनावट दस्तऐवज तयार करून त्यावर खोट्या सह्या करण्यात आल्या आणि संबंधित रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात बुलढाणा अर्बन सोसायटीच्या अहमदपूर शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक दयानंद गोरे, कर्मचारी भगतसिंग बयास आणि ज्ञानेश्वर सांगळे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच काही अन्य व्यक्तींच्या खात्यांवरही रक्कम जमा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०७३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत ७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक विनोद मनोहर मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कर्जफेडीसाठी जमा केलेल्या रकमांपैकी नेमकी किती रक्कम अपहारित झाली, या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि संबंधित आर्थिक व्यवहारांमागील वस्तुस्थिती काय आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बँकिंग व्यवहारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

सहकारी पतसंस्था आणि बँकांमधील आर्थिक व्यवहार, ग्राहकांच्या कर्जफेडीच्या नोंदी तसेच धनादेश व आरटीजीएस व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि अचूक नोंद ठेवणे आवश्यक आहे. अहमदपूरमधील या प्रकरणामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेचा आणि संस्थात्मक लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासातून या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi