Dailyhunt
अलिबागमध्ये शेकापचा जलवा; शिवसेना शिंदे गट २ ठिकाणी विजयी

अलिबागमध्ये शेकापचा जलवा; शिवसेना शिंदे गट २ ठिकाणी विजयी

रायगड, 30 एप्रिल (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बाजी मारत चार ठिकाणी विजय मिळवला, तर शिवसेना शिंदे गटाने दोन ठिकाणी यश मिळवले.

या निकालामुळे तालुक्यात शेकापचा दबदबा कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नवेदर नवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी शेकापच्या अंकिता जैतू या बिनविरोध निवडून आल्या. तसेच रेवदंडा ग्रामपंचायतीत शुभांगी कोंडे यांचीही बिनविरोध निवड झाली. नागाव, वैजाळी आणि खंडाळे ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी चुरशीची लढत झाली.

नागाव येथे शेकापच्या मंजुषा मंगेश राणे यांनी ३९९ मते मिळवत भाजपचे मंगेश आठवले (२२९ मते) यांचा पराभव केला. वैजाळीत शेकापचे नंदकुमार पाटील (४११ मते) यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार उमेश गावंड (३८३ मते) यांना मागे टाकत विजय मिळवला. खंडाळे येथे शिवसेना शिंदे गटाच्या श्रावणी कलगुटकर (३१८ मते) यांनी शेकापच्या समिक्षा गुरव (३०५ मते) यांच्यावर मात केली.

या निवडणुकीत नवेदर नवगाव, रेवदंडा, नागाव आणि वैजाळी या चार ग्रामपंचायतींवर शेकापचा लाल बावटा फडकला, तर कोप्रोली आणि खंडाळे येथे शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला.

मतमोजणी बुधवारी (दि. २९) अलिबाग तहसील कार्यालयात पार पडली. निकाल जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, तर काही ठिकाणी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi