Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

अमरावती जिल्ह्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू

अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)

प्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच जिल्ह्यातील तापमान ४६ ड्रिग्रीच्या वर पोहोचत असल्यामुळे वाढत्या उन्हाचा फटका बेघरांना बसत आहे. जिल्ह्यात धारणी व चिखलदरा तालुक्यात दोन बेघरांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

धारणी तालुक्यातील वनखंड क्रमांक ११८२, धामणनालाच्या आतील डाबका जंगल परिसरात एका ३५ ते ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली असता, जंगलातून जाणाऱ्यांच्या ही बाब निदर्शनात आली. सदर महिला ही आसपासच्या गावात भिक्षा मागत फिरत होती. आठवड्यापूर्वी तिला फिरत असताना नजीकच्याच एका गावातील लोकांनी बघितले होते. अनोळखी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपासणीअंती बेवारस महिलेचा वाढत्या उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली, असे धारणीचे ठाणेदार अवतारसिंह चव्हाण यांनी सांगितले. त्यात घातपात दिसून येत नाही. त्याचप्रमाणे चिखलदरा तालुक्यातील कामापूर शिवारात नणगीटा नाल्यात कडू अर्जुनच्या झाडाखाली ४० ते ४५ वर्षे वयोगटातील एका पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. चिखलदरा ठाण्यात याप्रकरणात अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली असून कामापूर शिवारातील व्यक्तीचीही ओळख अद्याप पटली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. शहरात उपचाराचे नियोजन सहज होऊ शकते. परंतु दुर्गम भागात तातडीने अशा घटना दृष्टीस पडत नाहीत. -विनोद पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi