Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमरावतीच्या उदखेड पुलावर ट्रक-पिकअपची भीषण धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी

अमरावतीच्या उदखेड पुलावर ट्रक-पिकअपची भीषण धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी

मरावती, 30 मे (हिं.स.) | मोर्शी-चांदूरबाजार मार्गावरील उदखेड येथील चारगड नदी पुलावर शनिवारी भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच ३१ एफसी ३६४५ हा भिलाई येथून अंजनगावकडे केळी भरण्यासाठी जात होता. तर एमएच १९ सीएक्स ०८०० क्रमांकाचे पिकअप वाहन जळगाव येथून वरूडकडे स्प्रिंकलरचे साहित्य घेऊन निघाले होते. सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास उदखेड येथील चारगड नदी पुलावर दोन्ही वाहने आली असता रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकांचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली.

अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर वाहनांची बाजूला व्यवस्था करण्यात आली आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली.

या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi